आठवणींच्या राज्यात
"अगं कार्तिकी काय झालय एवढं हसायला",आईचा आवाज आला आणि मी भानावर आले. आज अचानक मी लहानपणी एकदा पडले तो किस्सा आठवला. आणि दुसऱ्या क्षणी डोक्यात काहीतरी वेगळाच विचार...तो सुध्दा एक किस्साच...भाषेच्या गमतीचा...मराठी भाषा आहेच केवढी समृध्द ; सावरकरांंसारख्या थोरामोठ्यांचा वारसा लाभलेली! माय मराठी जेवढी समृध्द आहे तेवढीच गमतीशीर देखील. ही गंमत बोलताना कायम दिसून येते. एखाद्याने चुकून साडी घातली म्हटलं तरी आपण खळखळून हसतो. मग बाजूने एक आवाज येतो ,"अरे साडी घालत नाही , साडी नेसतात". अशावेळी दोन्ही वक्ते आनंदी होतात. पहिला आपल्यामुळे कोणीतरी हसले म्हणून(वक्ता आपली चूक मान्य करत नाही ही गोष्ट वेगळीच). आणि दुसरा आपण एखाद्याला ज्ञान दिले म्हणून आनंदून जातो(हेतू टोमणा मारण्याचा असेल तर ते त्या व्यक्तीलाच ठाऊक). हा आनंद काही क्षणांचा असतो पण स्मरणीय आठवण बनून जातो.
अशा अनेक आठवणींचा संच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. आठवणी ह्या आपल्या मनाचा अविभाज्य भाग असतात. काही गोड असतात तर काही कटू. कटू आठवणींनी रडू येते. पण तांदूळ निवडताना खडे बाजूला सारल्यावर ज्याप्रमाणे मऊ भात तयार होतो; त्याप्रमाणे आयुष्यातील दुःखाचे खडे बाजूला सारल्यावर उरतात गोड, सुखावह आठवणी. त्यांची माळ विणताना मन प्रफुल्लित होते. आणि जेव्हा अशा गोष्टी आठवतात तेव्हा चेहर्यावर अबसूकच हास्याची कळी उमटते.
असाच आठवणींचा खजिना माझ्याकडे सुध्दा आहे. किस्से खूप आहेत आधीच्या दोन आठवणींप्रमाणे; काही तर नीट आठवत देखील नाहीत. पण जेव्हा मी पहिल्यांदा रांगोळी काढली तो आनंद काही औरच आहे. खरं तर रांगोळी आणि माझा छत्तीसचा आकडा आहे असे मला नेहमी वाटायचे; कारण माझ्या हातून रांगोळी कधी नीट पडल्याचे मला आठवत नाही. पण म्हणतात ना, 'केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे' , 'प्रयत्नांती परमेश्वर'. या उक्ती माझ्या बाबतीत सुध्दा खर्या ठरल्या. जेव्हा मी मेहनतीने रांगोळी काढली तेव्हा मला यशाचे शिखर गाठल्यासारखे वाटले मला. ह्यावर्षीच्या दिवाळीत सुध्दा खरंतर मी रांगोळी काढणार नव्हते कारण आईची "साऊथ इंडियन स्टाईल" रांगोळी मला काही केल्या जमेना आणि आईची रांगोळी मला एवढी आवडते की दुसरे काही काढण्याचा मी विचारही करत नाही. मी ऐकलय की दिवाळी सुख, समाधान घेऊन येते. कदाचित ही दिवाळी माझ्यासाठी आनंद आणि आईसाठी समाधान घेऊन आली असावी; कारण अचानक रांगोळी काढण्याची इच्छा निर्माण झाली होती माझ्या मनात.
आई होती फराळाच्या लगबगीत. खरंतर मी आईला मदत करायला हवी होती पण मी मात्र फोन चार्जिंगवरुन काढून युट्यूबवर रांगोळ्या शोधायला लागले. ते पाहून आईला आश्चर्य वाटले पण तिच्या शांततेचे मला जास्त आश्चर्य वाटले. विडिओ पाहून वाटल मनात आले की जी सुचेल ती डिझाईन काढून रांगोळी काढावी. गेले रांगोळीचा डबा घेऊन घराबाहेर आणि त्या नादात घातलेला पसारा पाहून त्या दिवशी आई मला काहीच म्हणाली नाही. रांगोळी सोबतचा माझा खेळ बघून भाऊ माझ्यावर हसत होता. हळूहळू एक एक रेषा जुळवत रांगोळीचे कच्चे काम पूर्ण झाले. आणि वेगवेगळ्या रंगांनी ती आणखीच सुशोभित झाली. पूर्ण रांगोळी पाहिली तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझा आनंद गगनात मावेना. तेवढ्यात माझ्या कामाची पोचपावती सुध्दा मला मिळाली; आई बाबा आणि भावाची कौतुकाची थाप मिळाली. शेजारच्या ताईला तर तिच्या पहिल्या रांगोळीची आठवण झाली. पणत्या लावल्यावर त्या प्रकाशात रांगोळी जास्तच चमकून उठली. आई एकदम निश्चिंत झाली. तिने पूर्ण विश्वासाने रांगोळीची जबाबदारी तिच्या मुलीवर सोपवली. मला मोठे झाल्यासारखे ,जग जिंकल्यासारखे वाटले. काहीतरी नवीन आणि मोठे केल्याची भावना मनात घर करुन बसली.
काही मिनिटातच आईच्या फोनवरून स्टेटस अपलोड झाला. अर्थात तिला तिच्या मुलीचे यश सार्यांना सांगायचे होते. खूप रिप्लाय आले. माझ्या या छोट्याशा यशाच्या आनंदात असताना मनात एक विचार आला...मोबाईलमध्ये आठवणी कैद करता येतील पण भावभावना कैद करणे हे मनाचेच काम. स्वरचित हॅशटॅग्जमधून भावना व्यक्त होतीलही पण मनात काय चालू असते ते मनापाशीच!
मनात अनेक भावनांनी आनंदाचा कल्लोळ माजवला...आणि माझी पहिलीवहिली रांगोळी जमा झाली माझ्या आठवणींच्या खजिन्यात!!!!!
Mastach
ReplyDeleteAwesome kartiki💕💕💕
ReplyDeleteखूप छान कार्तिकी... भाषेच्या गंमती पासून जुन्या आठवणी रंगवत रांगोळी काढेपर्यंतचे छान शब्दचित्र रेखाटले आहेस...
ReplyDeleteअसेच मला कायम प्रोत्साहन देत राहा😊😊🙏
Delete