माझं आवडतं पात्र

 थांब! तुला शिकविण चांगला धडा!

तुझ्या पापांचा भरलाय घडा...

मराठी साहित्य आणि मराठी वाड्मयावर या ओळीने पाडलेली छाप काही औरच आहे! ही ओळ जिच्या ओठी शोभून दिसते त्या फुलराणीबद्दल बोलावे तितके कमीच. फुलं आणि गजरे विकून उदरनिर्वाह करणारी मंजुळा जिने फ्लोरिस्टाच्या शाॅपातल्या बाईसारखे बनण्याचे स्वप्न पाहिले तिला एक आदर्श म्हणून संबोधले तर त्यात काही वावगे ठरणार नाही!

रस्त्यावर वणवण भटकणारी एखादी बाई जिच्या भाषेला ताल नाही आणि जीवनाला लय नाही, अशा व्यक्तीला आदर्श म्हणून संबोधले तर साहजिकच प्रत्येकाच्या कपाळावर पडलेल्या आठ्या आणि चेहर्यावर वाजलेले बारा कधी दिसेनासे होतील ते सांगता येणार नाही. याला कारण म्हणजे आपली विचारसरणी! अर्थात आपली विचारसरणी काही कमजोर नाही किंवा तिच्यात कोणतीही कमतरता देखील नाही. नीटनेटकेपणा हा उत्तम व्यक्तिमत्त्वाचा कणा असतोच...पण म्हणून एखाद्याचे अस्तित्व नाकारणे आणि आहे तसे किंबहुना अंशात्मक अस्तित्व डिवचण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला?

पु.‌ ल. म्हणजेच आपल्या लाडक्या पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी रेखाटलेली फुलराणी आणि तिचा मंजुळा बनण्याचा प्रवास वाचताना वर प्रकट केलेले आणि असे अनेक प्रश्न डोकं भंडावून सोडतात. का कोण जाणे पण 'ती फुलराणी'चे शेवटचे पान संपवून पुस्तक बंद केल्यावर मन आपसूकच विचारांच्या खोल गर्तेत शिरते. आपल्या एका चुकीच्या हावभावाने समोरच्याला झालेली जखम आपल्या मनावर भरघोस मीठ चोळते. यातून उठणारी अग्नि मनाचा दाह शांत करून विचारांचा कायापालट होण्यास मदत करते. ज्याप्रमाणे विस्तीर्ण पसरलेल्या जगात रोज मिळणारे नवनवीन अनुभव व्यक्तीला जगण्याची नावीन्यपूर्ण उमेद दाखवतात त्याप्रमाणेच पु. लं.सारख्या असामी लेखकाच्या लेखनशैलीतून उमटलेली फुलराणी प्रत्येक व्यक्तीला माणूस बनण्याचे बाळकडू प्राप्त करून देते.
यामुळेच मंजुळेचा प्रवास नेहमीच वाचत राहावासा वाटतो.



ज्याच्या ठायी असते जिद्द,
त्याला अडवत नाही कुठलीच हद्द ||
वरील ओळी म्हणजे मानवी जीवनाचे सत्य. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठीच जिद्द व चिकाटी जगण्याचा आनंद मिळवून देते. मंजुळाच्या बाबतीतही असेच काहीसे घडते‌. एका पैजेमुळे आणि पै
जेचे खेळणं ‌बनून राहिलेली मंजुळा क्षणाक्षणाचा अपमान आणि आपल्या असण्याचा इतरांना वाटणारा तिरस्कार या दोन दगडांवर पाय रोवून जीवनाच्या घोडदौडीत आपल्याला तत्परता आणि कष्टाचा धडा देते. आपल्या अस्तित्वाची लढाई जगताना स्वाभिमानाची मशाल आणि हिंमतीची ढाल सोबत घेऊन दिवस ढकलणारी ही नायिका जगातल्या लाखोंच्या शर्यतीत 'स्व'चा दिवा तेवता ठेवण्याची शिकवण देते. वाटेवरचे काटे झुगारून कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्जुनाप्रमाणे आपला नेम ढळू न देता लक्ष्याकडे कूच करण्याची चिकाटी मंजुळेच्या व्यक्तिरेखेस आणखीनच उठावदार बनते. अशाप्रकारे सुप्त निरीक्षण शक्ती आणि प्रशंसनीय लेखनकौशल्याच्या आधारावर जन्माला आलेली नायिका आजही वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.


म्हणूनच प्रेरणादायी ठरणारी फुलराणी हे माझ्यासाठी आजन्म आवडते पात्र ठरणार हे नक्की!

Comments

  1. Replies
    1. खूप छान लिहितेस. ओघवती भाषा शैली. खूप शुभेच्छा!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मतदान कक्षातील बाकावरून

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...