बोम्मारिल्लू: एक नवा दृष्टिकोन

दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझ्या WhatsApp statusला असलेल्या एका फोटोने मला अनेकांशी virtual भेट घडवून दिली. कित्येक महिने बोलणे न झालेल्या लोकांचे मला समोरून मेसेज आले! जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि विसंवादाचा बांध फुटून नव्याने मैत्री खुलण्याची आशा निर्माण झाली. काही संदेश म्हणजे आठवणी तर काही म्हणजे प्रश्न....असे काही प्रश्न ज्यांनी माझी दिवाळी तेजोमय करण्यात भर घातली यात शंकाच नाही! 

हा फोटो म्हणजे मी दिवाळीनिमित्त मांडलेलं बोम्मारिल्लू...म्हणजेच भातुकली जिला आपण इंग्रजीमध्ये Dollhouse म्हणतो. माझ्या फोटोमध्ये Doll नव्हती पण कदाचित तिची कमतरता कुठे जाणवली नाही. याच बोम्मारिल्लूच्या फोटोवरून कित्येक जणांनी मला मी आजही भातुकली खेळते का? आणि भातुकली का मांडून ठेवते असे प्रश्न विचारले...अर्थात माझ्या मैत्रिणीचं तर काय करू आणि काय नको असं काहीसं झाल्याचं सुद्धा माझ्या लक्षात आलं! हे प्रश्न यापूर्वीही मला अनेकांनी विचारले. पण यंदाच्या status replyने मला विचार करायला भाग पाडले. विचारांची ही शिदोरी मला सामाजिक शास्त्राच्या अभ्यासातून मिळाली हे सुद्धा खरंच! 

खेळाला वयाचे बंधन नसते असे आपण सगळेच म्हणतो. पण हे कितपत खरे आहे याची प्रचिती मला या वर्षी भातुकली मांडल्यावर आली. मी आजही भांडी मांडून घर तयार करते याचे काहींना नवल वाटले तर काहींना कुतूहल आणि काहींनी आवर्जून मला माझ्या वयाची आठवण करून दिली! पण म्हणतात ना, 'मुले ही देवाघरची फुले'. बोम्मारिल्लू हे त्याच फुलांच्या कोमलतेचे प्रतीक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भातुकली म्हणजेच माझं बोम्मारिल्लू ही दिवाळी मधील एक पिढीजात चालत आलेली परंपरा. तिला ना कसले बंधन ना कसली अडवणूक. उलट बोम्मारिल्लू मांडलं नाही तर दिवाळी जणू अपूर्ण राहिल्यासारखी वाटते. माझ्या बाबतीत असं असलं तरी मला काहींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या खेळाच्या सुंदरतेमध्ये दडलेली आहेत. लहान लहान माती, स्टील, काच आणि पितळीची भांडी बघितल्यावर आपल्यातले लहान मूल टुणकन उडी मारून बाहेर आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच वयाच्या बेड्या तोडून टाकणारा हा खेळ निखळ आनंद प्रदान करतो.

आनंद, समाधान आणि बालपणीची आठवण करून देणारा हा खेळ समाजाच्या नियमांवर आधारलेला आहे. चूल आणि मूल ही संकल्पना या खेळाद्वारे नकळतपणे समाजमनात रुजलेल्या मुलगा-मुलगी या भेदभावावर भाष्य करते. वरवर पाहता लहानांना आणि विशेषतः मुलींना पुढच्या आयुष्याची दिशा देणारी ही परंपरा gender discrimination दाखवणारी असली तरी खोलात भविष्याचे बीज पेरलेले असते हे नक्की! कारण खेळ हे केवळ बालपणीचे सौंदर्य खुलवत नाही तर जीवनावश्यक कौशल्यांची शिदोरी चिमुकल्या मनाला प्रदान करतात. Sociology विषयाच्या अभ्यासातून बोम्मारिल्लूचा हा अदृश्य परिणाम जाणून घेण्यास मला मदत झाली.

लहान लहान भांडी आयुष्याचे मोठमोठे धडे शिकवतात. इवल्याशा वयात बोम्मारिल्लू आयुष्याच्या पाटीवर अनुभवाची बाराखडी गिरवण्याची उमेद देते. संस्कार, शिकवण, अनुभव आणि विचार यांचा संगम बोम्मारिल्लूमधून दिसून येतो. म्हणूनच माझ्यामते बोम्मारिल्लू ही स्वतःमध्ये एक अशी संस्कृती आहे ज्यामध्ये जीवनासाठी महत्त्वाची विविध मूल्ये अंतर्भूत असतात. हे एक कारण असेल ज्यामुळे online आणि simulation gamesच्या काळात देखील भातुकलीचे सौंदर्य टिकून राहिले आहे. 

सण म्हणजे देवाचा आशिर्वाद घेण्याचा सुंदर योग असे आपण नेहमीच म्हणतो. मला मिळालेल्या माहितीनुसार बोम्मारिल्लू हा देखील असाच एक योग असतो ज्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर देवी अन्नपूर्णेचा आशिर्वाद मिळतो. या प्रथेमुळे खेळाचे पावित्र्य जपले गेले आहे. अशाच प्रथा आणि परंपरा यांनी नटलेले बोम्मारिल्लू मुलांच्या उत्साहात भर पाडण्यात कुठेही कमी पडत नाही. 

सामाजिक सुसंवाद म्हणजेच social interaction हा मानवी जडणघडणीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लहान मुले खेळांद्वारे सुसंवादाचे धडे शिकतात. त्याबरोबरच बांधिलकी, एकता, नावीन्य, कलात्मकता आणि अशा अनेक जीवनावश्यक मूल्यांचे अंकुर बोम्मारिल्लूमधून फुटतात. म्हणूनच जीवन ही अविरत चालणारी शाळा असून माणूस हा आजन्म या विस्तारलेल्या विद्यालयाचा विद्यार्थी असतो, ही संकल्पना पुन्हा एकदा मौजमजेच्या रूपात प्रत्यक्षात येते. 

जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून आज बोम्मारिल्लूतील धातूच्या भांड्यांची जागा प्लॅस्टिकच्या भांड्यांनी घेतली. परंतु 'जुने ते सोने' या उक्तीप्रमाणे भातुकलीमध्ये पारंपरिकतेचे नावीन्य आजही जपले जाते. अशा कोणत्याही परिस्थितीत आपले रूप जपणाऱ्या बोम्मारिल्लूमध्ये जीवनाचा मंत्र दडलेला आहे. निरीक्षण, अनुकरण आणि प्रयोग यांचा मेळ म्हणजे बोम्मारिल्लू. माझ्या अनुभवाला अभ्यासाची जोड दिली तर येणारे उत्तर म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास, जो या खेळातून नक्कीच साध्य होते.  

लेखनाच्या जगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा सण म्हणजे दिवाळी हा उल्लेख आपण शालेय जीवनापासून शिकत आलो आहोत. म्हणूनच दिवाळीला अधिक तेज चढविणारा हा खेळ म्हणजे जणू 'सोने पे सुहागा'!



Comments

  1. कार्तिकी विषय खुप छान निवडला.लेखन अप्रतिम उत्तरोत्तर प्रगती होवो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मतदान कक्षातील बाकावरून

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...