खिडकीबाहेर डोकावताना

माणूस सातत्याने शिकत असतो असे आपण नेहमी म्हणतो. पण शिकण्याची सार्थकता कितपत दिसून येते हा आजकालचा चर्चेचा मुद्दा बनला आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटना बघताना व त्यावरील पिढीजात चालत येणारी टिपणी ऐकताना 'सुशिक्षित वर्गाचे अशैक्षणिकत्व' ही उपमा खरी ठरताना दिसते. 

ट्रेनच्या प्रवासात असे किस्से सर्रास दिसून येतात. काही दिवसांपूर्वीची गोष्ट, ट्रेनमध्ये काही तृतीयपंथी चढले. (समानतेचे मूल्य स्वीकारून देखील आपण आजही लोकांना प्रथम-द्वितीय-तृतीय अशा क्रमवारीत विभागतो याचे कुतूहल वाटते) सकाळची गर्दीची वेळ आणि जोडीला गाडी उशिरा आली म्हणून प्रवाशांची होणारी अस्वस्थता. या सगळ्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतानाही first classच्या लहान डब्यात गर्दी होण्याचे कारण ठरले सोबत असलेले हे सहप्रवासी. गाडीच्या प्रथम दर्जाच्या डब्यात प्रवास करण्यासाठी लागणारे योग्य ते तिकीट असून सुद्धा केवळ त्या व्यक्ती 'समाजाच्या तराजूत समान मोलाच्या नाहीत', या मानसिकतेने सर्वांच्या वक्र नजरा त्यांनाच दूषणे देत होत्या. कायदेमंडळाच्या तरतुदी आणि कागदोपत्री न्याय हक्क मिळवून देतात; परंतू हे हक्क बजावण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकवेळी मिळतेच असे नाही, ही गोष्ट त्यावेळी प्रकर्षाने जाणवली. हा फक्त एक प्रसंग. अशा अनेक गोष्टी आपल्या सभोवताली घडतात, ज्या प्रासंगिक का होईना पण मानवी विचारांना चालना देतात. काही मुद्दे चर्चेचा विषय ठरतात तर काही केवळ अनुभवापर्यंत सीमित राहतात. 

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाचा कलिना विभाग माझ्यासाठी नित्यक्रमाचा भाग बनला आहे. इथली हिरवळ मनाला ऊर्जा देते आणि इथवरचा पल्ला गाठताना मिश्र अनुभवांचा आस्वाद घेता येतो. 

त्यातील आजपर्यंत उत्तर न मिळालेल्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे कुर्ला ते सांताक्रुझ आणि सांताक्रुझ ते कुर्ला अशा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराहून जाणारी आणि विद्यापीठाच्या आवारात फिरून जाणारी बस यांच्या फेरीत तफावत का? 

कधी २०-२५ मिनिटे रांगेत उभे राहून सुद्धा बसमध्ये बसायला जागा मिळत नाही तर कधी कंडक्टर काका एका तिकीटावर मोठ्या नोटांचे सुट्टे देतात! ट्रॅफिकमध्ये लागणारा वेळ आणि धुळीमुळे नाकाचा चालणारा लपंडाव काहीवेळेला वैताग आणतो तर दुसर्‍याच क्षणी एखादी मावशी मन वळवते. हे जग वेगळे आणि तितकेच वैविध्यपूर्ण असते. 

कुर्ला ते विद्यापीठ हा मार्ग जितका सरळ तितकाच विरोधाभासी! उड्डाणपुलावरून जाताना मिळणारा गार वारा पुलाखाली दडलेले वास्तव दडवून टाकतो.  मिठी नदीचे काळवटलेले पाणी मात्र नेहमी बोलके ठरते. तिच्या चोहोबाजूंनी असलेले रस्ते, उड्डाणपूल, त्यावर चालणारे मेट्रोचे बांधकाम आणि जोडीला दिवसागणिक वाढणारे धूलिकण 'Transforming Mumbai'चा वेगळा प्रत्यय घडवतात. 

उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने इंद्रधनुष्यातील जवळपास सर्वच रंगछटा आहेत. कदाचित हे रंग पाहून प्रवाशांना आनंद मिळावा ही त्यामागील संकल्पना असावी. मात्र तो आनंद असतो फक्त क्षणिक! कारण जमिनीकडे नजर जाताच विखुरलेली वस्ती आणि तितकेच विखुरलेले मानवी जीवन लक्ष वेधून घेते. विकास व वास्तवामधील फारकत लगेच जाणवते. तेवढ्यात बाजूला एक बाई कडेवर बाळ घेऊन वाहनांच्या गर्दीत आपला उदरनिर्वाह भागेल अशी अपेक्षा बाळगताना दिसते. मात्र तिच्या पदरी निराशा पडते. यामध्ये भर म्हणून अवाढव्य पसरलेल्या वस्तीत lavish lifestyleचे आश्वासन देणारे गगनचुंबी इमारतींचे hoardings दिसतात. या सर्व विरोधाभासी घटनांची छाप घेत आपण रोज तीच परिस्थिती बघण्यासाठी सज्ज होतो. 

भारतीय संविधानातील मूल्ये अभ्यासताना हा प्रवास खूप काही सांगतो. वाचक म्हणून संविधानातील क्लिष्ट वाटणार्‍या तरतुदी त्यांच्या अंमलबजावणीतील असमानता पाहून आणखीनच क्लिष्ट असल्यासारख्या वाटतात. Mainstream आणि periphery बद्दलच्या चर्चा डोळ्यांदेखत दिसल्यावर मेंदूत प्रश्नांचा कल्लोळ माजल्याशिवाय राहत नाही. 

हा संपूर्ण प्रवास घडताना खिडकीच्या बाजूला मिळणारी जागा वास्तवदर्शी ठरते. कारण ३७॰ सेल्सियस तापमानात डोक्यात प्रकाश पडणे म्हणजे काय हे अनुभवताना मोबाईलवर अद्ययावत माहिती घेण्याच्या नादात आपण reality check घ्यायचा विसरतो हे नक्की! 

 

Comments

Popular posts from this blog

मतदान कक्षातील बाकावरून

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...