Algorithm च्या जगात
काल सकाळी फोन पाहिला तर वॉलपेपर पासून सगळीकडेच मैत्री दिनाचे photos, posts आणि status. इतकंच काय तर सार्वजनिक वाहतुकीची माहिती देणार्या m-indicator या aap कडून सुद्धा 'Happy Friendship Day' असा संदेश आला. तंत्रज्ञानाचा fast and furious पणा लक्षात यायला किंचितही अवधी लागला नाही. मी इतर कोणाला मौखिक किंवा शाब्दिक शुभेच्छा देण्यापूर्वी virtual जगाने केव्हाच मला त्याच्या मैत्रीमध्ये स्थान दिले होते. समाज माध्यमांवर तर शुभेच्छांची रेलचेल दिवसभर एका अदृश्य स्पर्धेप्रमाणे जाणवली! WhatsApp status ला कोण किती photos टाकेल याची जणू चढाओढच सुरू होती. या सार्यामध्ये आठवणी, अनुभव आणि नात्यांची नव्याने सफर करता आली. अक्षरशः एका दिवसात अनेक वर्षांची दुनिया पाहून आल्यासारखे वाटले. प्रचलित अशा time machineच्या संशोधनाला आठवणींच्या गतीने कधीच बाजूला सारले होते. या सगळ्यात मौज, मजा, गंमत आणि आपलेपणा वाटला. काही काळ social media user असल्याचा फायदा जाणवला आणि दुसर्याच क्षणी वेगळाच विचार घोंगावू लागला.
सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार social media वर केलेल्या पोस्टवर कारवाई केली जाणार नाही. हा निर्णय स्वागतार्हच आहे; कारण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे घटनेतच नव्हे तर आपल्या जीवनातही महत्त्वाचे आहे. आज social media platformsकडे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते. परंतु व्यक्त होताना समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर करण्याची वृत्ती नाहीशी होताना दिसते. याला algorithm हे एक कारण असावे असे मला वाटते. Algorithm ही एक software प्रणाली आहे ज्याद्वारे वापरकर्त्यांच्या आवडी, त्यांचा वैचारिक कल, वापरकर्त्याने दिलेली माहिती यांची सांगड घालून वापरकर्त्याचा समाज माध्यमांच्या वापराचा अनुभव वृद्धिंगत होईल आणि समाज माध्यमांवर सक्रीय राहण्याकडे त्याचा कल असेल अशी माहिती उपलब्ध करून देते. यामुळे लोकांना अद्ययावत माहिती तर मिळतेच परंतु अनेकदा माहिती एकतर्फी ठरते. साहजिकच नाण्याची दुसरी बाजू समजून घेण्याची उत्कंठा कमी होते. समाज माध्यमांवर आपण कोणत्याही अडचणीविना व्यक्त होऊ शकतो हा केवळ भ्रमाचा भोपळा ठरतो कारण बर्याचदा social media वरची आपली सक्रीयता algorithm च्या माध्यमातून ठरते. माहितीमध्ये भर पडणे चुकीचे नाही. किंबहुना आजच्या technosavy युगात जितके वाचावे आणि जितके शिकावे तितके कमीच! परंतु माणसाने तयार केलेल्या तंत्रज्ञानाने माणसाच्या सारासार विवेकबुद्धीवर कितपत प्रभाव पाडावा हे देखील माणसाच्याच हातात असते.
तंत्रज्ञानाच्या युगात जन्माला आलेले मोबाईल, लॅपटॉप यांसारखे चौकोन वापरल्याशिवाय आज माणसाचा दिवस संपत नाही. या चार भिंतींनी तयार झालेल्या घरात निव्वळ करंगळीच्या वापराने देखील सारे जग आपल्यात सामावून घेण्याची क्षमता आहे. यामुळेच आपल्याला घरबसल्या अनुभवता येणारे आणि अगदी तळहातावर विसावणारे virtual जग हवेहवेसे वाटते. Algorithmच्या साहाय्याने या अनुभवविश्वाला सहज पाचारण केले जाते. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि घड्याळाच्या काट्यांवर चालणार्या जीवनात एका बोटाच्या क्लिकनुसार बदलत राहणारे जग वरदान ठरले आहे. हा बदल पूर्णपणे वैयक्तिक असल्याने तो अबसूकच जवळचा बनतो.
आज virtual reality या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. परंतु 18व्या शतकात हे शोध लागण्यापूर्वी देखील मानवी जीवन एकमेकांच्या सानिध्यात फुलत होते. फरक इतकाच की आजच्या space-time compressionमुळे सहजीवन अधिक सहज व सुखकर बनले आहे.
Algorithm ही संकल्पना म्हणूनच तंत्रज्ञानाची नव्हे तर नैसर्गिक देणगी आहे असे मला वाटते. Social media algorithmच्या काळात आपण दिलेली माहिती व आपला प्राधान्यक्रम यानुसार आपल्याला कोणत्या जाहिराती दिसणार हे ठरते. परंतु मानवी algorithm बाह्यजगाचा अनुभव व माणसाची आंतरिक प्रतिक्रिया यावरून ठरते. यामधे पसंतीक्रमाचा समावेश असतोच आणि जोडीला परस्परविरोधी प्राधान्यांचा देखील समावेश असतो.
कधीकधी हा algorithm म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली शिदोरी असते. कौटुंबिक सहवास हे मानवी algorithmचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपली जडणघडण याच संस्कार, शिकवण, शिस्त आणि शिदोरीरूपी अदृश्य algorithmच्या सानिध्यात होत असते आणि हाच ठेवा व्यक्तीला बाह्यजगाला सामोरे जाण्यास सज्ज करतो. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, स्वावलंबन, सहाय्यक वृत्ती, सामाजिक बांधिलकी असे पुढील जीवनात आवश्यक असलेले algorithmic तंतू कुटुंबासोबतच शालेय जीवन देखील प्रदान करते.
एका प्रचलित वाक्यानुसार 'रक्ताची नाती निवडताना नसलेले स्वातंत्र्य मैत्री निवडताना मिळते' असे म्हटले जाते. मैत्री दिनाच्या औचित्यावर या वाक्याची समर्पकता दिसून आली. परंतु मैत्री ही केवळ बाहेरच्या जगात मिळते का? कुटुंबात देखील मैत्रीचा पुरेसा अनुभव घेता येतो. अशी घर आणि घरातील comfort zoneच्या बाहेर पडून तयार होणारी मैत्रीची नाती algorithmचा जिवंतपणा कायम ठेवतात. हे algorithm आपल्या आवडीनिवडी जोपासतात, आचारविचार स्वीकारतात आणि आपल्या जीवनात मिश्र रंगछटा उमटवतात. या छटांमुळे जीवन रंगीबेरंगी बनते. Social media algorithm हे user-friendly अनुभव देतात तर मानवी algorithm वास्तविकता दर्शवतात. कारण मानव्य algorithmचे जाळे म्हणजे लोकांच्या परस्परसंवादाची प्रतिमा असते. त्यात कोडकौतुकाचे स्थान अढळ असतेच; परंतु वेळप्रसंगी चूक दाखवून देण्याची, आपल्या कृतींमध्ये बदल घडवून आणण्याची आणि जीवनाचा नवा दृष्टिकोन शोधण्याची उमेद दडलेली असते. Personalised experience ही संकल्पना जरी तंत्रज्ञानामुळे विकसित झाली असेल तरी मानवी व्यवहारात तिचे गमक उमगते.
मानवी जीवनात भावनांना, भावनिक संबंधांना विशेष महत्त्व आहे. मानवी algorithm या संबंधांना वृद्धिंगत करतात. आपुलकी, विश्वास अशा सुहृद ठरणाऱ्या भावनांना मैत्रीमध्ये सर्वोच्च स्थान असते असे म्हटले जाते. एखाद्या गंभीर व विकट परिस्थितीला सामोरे जाताना या भावनांचे परीक्षण होते. बाह्य जगाचा हाच अनुभव algorithmच्या तारा दृढ करण्यात भूमिका बजावतो. सुखद क्षणी सगळेच सोबती असतात. कौतुकास्पद कामगिरी केल्यावर शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव सढळ हस्ते होताना दिसतो. मात्र कठीण प्रसंगी सकारात्मकेची ऊर्जा व नावीन्याची उमेद देणारे क्वचितच असतात. Social media algorithm आपल्यासाठी आभासी श्रेष्ठत्वाचे जग तयार करतात तर माणसाळलेले algorithm ground realityचा अनुभव देतात. Social mediaवर व्यक्त होताना लोक काय म्हणतील, हा विचार बर्याचदा प्रबळ ठरतो. याउलट जीवनाच्या वीणेवर छेडल्या जाणाऱ्या भावभावनांच्या तारा सुरेल, समर्पक, समाधानकारक अशा जीवनगीताचा आविष्कार साधतात.
जन्मभूमीशी जोडलेल्या नाळेप्रमाणे जन्मदात्रीशी जुळलेली नाळ म्हणजे मानवी algorithmच्या प्रवासाची सुरुवात म्हणता येईल. पुढे याच तारा वयागणिक विस्तारात जातात आणि कुटुंबापश्चात मैत्रीच्या दुनियेत लखलखीत होऊन चमकताना दिसतात. हे algorithmic जग खऱ्या अर्थाने आपलेसे वाटते. शेवटी पु. लं.ची मैत्रीची व्याख्या नमूद करावीशी वाटते,
मैत्री एक सोपी व्याख्या आहे...
रोज आठवण यावी अस काही नाही
रोज भेट व्हाव असं काही नाही
एवढंच कशाला रोज बोलणं व्हांव असंही काहीच नाही
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री
आणी तुला याची जाणीव असणं
ही झाली मैत्री...
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं !
Very well written! खूप सुंदर!!
ReplyDeleteKhup masta!!
ReplyDelete