आगमनाचे सौंदर्य
ग्रीष्माचे ते दिवस असहाय्य होत होते. मनाचा धीर देखील सुटत चालला होता. ऊन-वाऱ्याचा खेळ मनाजोगता निर्णय देत नव्हता. आम्रपकवान्नांनी जठराग्नी केव्हाच थंड झाला. फुलपाखरासारखे चंचल मन चिंब होण्यासाठी आतुर बनले होते. अंततः ही आतुरता संपण्याच्या दिशेने ऋतुचक्राची घोडदौड सुरू झाली. त्यादिवशी दुपारची विश्रांती लवकर आटोपली. ही दुपार कंटाळवाणी नव्हती. का कुणास ठाऊक पण नेहमीप्रमाणे शीण आला नव्हता. उलट जाग आल्यावर प्रसन्न वाटत होते. दिवसभरात सूर्यदेवाचे दर्शन घडले नाही. त्यामुळेच नवचैतन्याच्या आगमनाची चाहूल लागली. अथांग पसरलेले आकाश आणि त्याखाली वसणाऱ्या सृष्टीमध्ये क्षणोक्षणी विविध घटना घडत होत्या. परंतु वातावरणात एक प्रकारची सुखदायक शांतता होती. निसर्गाचे हे नवे रूप न्याहाळताना मन प्रफुल्लित होऊन गेले. आकाशातील रंगछटांसमोर जणू इंद्रधनुष्याचे सौंदर्य देखील फिकट पडले असते! ढग आपला प्रवास करत होते. निळसर आकाशात पांढर्याशुभ्र आकृतींमधून गडद ढग आपली जागा घेत पुढे जात होते. ढगांची ही व्याप्तता ...