आगमनाचे सौंदर्य
ग्रीष्माचे ते दिवस असहाय्य होत होते. मनाचा धीर देखील सुटत चालला होता. ऊन-वाऱ्याचा खेळ मनाजोगता निर्णय देत नव्हता. आम्रपकवान्नांनी जठराग्नी केव्हाच थंड झाला. फुलपाखरासारखे चंचल मन चिंब होण्यासाठी आतुर बनले होते. अंततः ही आतुरता संपण्याच्या दिशेने ऋतुचक्राची घोडदौड सुरू झाली.
त्यादिवशी दुपारची विश्रांती लवकर आटोपली. ही दुपार कंटाळवाणी नव्हती. का कुणास ठाऊक पण नेहमीप्रमाणे शीण आला नव्हता. उलट जाग आल्यावर प्रसन्न वाटत होते. दिवसभरात सूर्यदेवाचे दर्शन घडले नाही. त्यामुळेच नवचैतन्याच्या आगमनाची चाहूल लागली.
अथांग पसरलेले आकाश आणि त्याखाली वसणाऱ्या सृष्टीमध्ये क्षणोक्षणी विविध घटना घडत होत्या. परंतु वातावरणात एक प्रकारची सुखदायक शांतता होती. निसर्गाचे हे नवे रूप न्याहाळताना मन प्रफुल्लित होऊन गेले. आकाशातील रंगछटांसमोर जणू इंद्रधनुष्याचे सौंदर्य देखील फिकट पडले असते!
ढग आपला प्रवास करत होते. निळसर आकाशात पांढर्याशुभ्र आकृतींमधून गडद ढग आपली जागा घेत पुढे जात होते. ढगांची ही व्याप्तता हृदयाचे ठोके वाढवत होती. मधूनच पक्ष्यांच्या कलकलाटाने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. पंख फडफडवत १८० अंशात भ्रमण करणारे थवे निसर्गात होणारा बदल पाहण्यासाठी आपली जागा निश्चित करत होते. सर्वजण आपल्या परीने वर्षाराणीच्या स्वागताची सज्जता करण्यात मग्न होते. काही पक्षी झाडांवर तर काही इमारतींच्या छतावर बसले.
इतक्यात अंधुकश्या रूपात पावसाचे दर्शन घडले. डोळ्यांना दिसणारे थेंब खरे की भास तेच समजत नव्हते. परंतु थेंबांच्या स्पर्शाने ओल्या झालेल्या भूमीने पावसाच्या आगमनाची प्रचिती दिली. सरसर बरसणाऱ्या आडव्यातिडव्या सरी तोंडावर शिंतोडे उडवताना स्वर्गसुखाची अनुभूती झाली.
अचानक वार्याची मंद झुळूक आली आणि पर्जन्याला सोबत घेऊन गेली. क्षणात मनाचा हिरमोड झाला. हा खेळ १०-१५ मिनिटे असाच सुरू राहिला. लहान मूल बनून तो खेळण्यात मजा होती.
यावेळी निसर्ग नेहमीसारखाच होता. त्याच्यात नवचैतन्याची भर पडली. थोड्या वेळाने सकाळी दिसणारे वातावरण संध्याकाळी दिसू लागले. आकाशातल्या रंगछटांनी पुन्हा एकदा आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. यात मन रमते न रमते तेवढ्यात पुन्हा पाऊस आला. यावेळी पावसाचा जोर थोडा वाढला होता. सोबत वाऱ्यानेही जोर धरला. परंतु बाल्कनीतून घरात जाण्याची इच्छा होत नव्हती. आज पावसाच्या थेंबात ओलेचिंब होण्यासाठी झाडांनी सुद्धा स्तब्ध राहण्याची शपथ घेतली.
निसर्गात पसरणाऱ्या नावीन्याने आणि मातीतून दरवळणाऱ्या सुगंधाने मनाची तृप्तता अंतिम टोकापर्यंत पोहोचली होती. इतक्यात आईची हाक ऐकू आली आणि मी भानावर आले. समोर असलेल्या कॉफीमुळे मिळणारा ताजेपणा मी कधीच अनुभवला होता. मनाचा थांगपत्ता लागत नाही हे पुन्हा एकदा माझ्या लक्षात आले. बाहेर कोसळणाऱ्या धो-धो सरींनी माझ्या मनाला माझ्या आवडत्या आणि मनात घर केलेल्या पावसाची आठवण करून दिली. दोन वर्षांपूर्वी अनुभवलेल्या त्या दिवसाचे चित्र मनात आजही कायम आहे. त्या क्षणांची आठवण आजही मन ताजेतवाने बनवते.
अशा या अविस्मरणीय आगमनाचे सौंदर्य अनुभवून मी पुन्हा माझ्या कामाला लागले!
मस्त 👌👌👌
ReplyDeleteवाह! खूप छान वर्णन केले आहेस💙
ReplyDeleteAmazing Kartiki! Vaachtana khup aanand zhala:) asach lihat raha!
ReplyDelete