हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण
"अगं कार्तिकी, पाऊस ओसरला, जमीन सुकून कोरडी झाली आणि तुझी कॉफीसुद्धा गार झाली! कुठे हरवलीस?"
डोक्यात माजलेले विचारांचे काहूर शमवताना बाबांच्या हाकेने तंद्री सुटली आणि मी भानावर आले. त्या दिवशी अचानक सकाळी पाऊस पडला. तसे आजकाल कोणत्याही ऋतूला कधीही दर्शन देण्याची सवय झाली आहे. पण वैशाखाच्या रखरखत्या उन्हात घामाने ओलेचिंब झालेल्या चेहर्यावर पावसाचे पाणी पडले आणि विचारांचा दुष्काळ सरून आनंदाचा पूर आला. त्या नादात मी दुसर्या जगात पोहोचले; असे जग जिथे माझ्यासोबत होते माझे शब्द, माझ्या कल्पना आणि माझे शब्दांगण! अशा स्वतःसाठी नकळत दिल्या जाणार्या वेळेत मला मी नव्याने उलगडताना जाणवते.
कधीतरी शांत बसून स्वतःच्या विचारांचे पिसारे फुलवताना मला माझीच एक नवी ओळख पटते. ही ओळख जगाने दिलेल्या व्याख्येपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. जगासाठी मी विशीतली, करिअरच्या शर्यतीत धावणारी, शहाणपणा, समजूतदारी, सामंजस्य आणि जबाबदारीचे धडे गिरवणारी तरुणी असेन; पण माझ्या आत अजूनही एक अल्लड, खट्याळ, 'बोम्मरिल्लू'मध्ये (अर्थात भातुकली) रमणारी मुलगी जिवंत आहे. या जगाला लोक कदाचित वेंधळेपण म्हणतील, पण माझ्यासाठी हे स्वतःला जपण्याचे आणि या स्पर्धेच्या जगातून स्वतःची सुटका करून घेण्याचे एक गमक आहे.
विचारांती लक्षात येते की माझे हे वेंधळेपण कधी 'मिस्टर बीन'च्या निरागस मूक संवादासारखे असते, तर कधी 'चार्ली चॅप्लिन'च्या निस्वार्थी हसण्यासारखे. कधीकधी घरामध्ये वावरताना मी स्वतःशीच किंवा समोरच्या निर्जीव वस्तूंशी बडबडते. बघणाऱ्याला हे वेडेपण वाटू शकते, पण या संवादात ना कोणाची सुनावणी असते की कुणाचा फैसला. फुटपाथवरच्या कडेला असणार्या उंचवट्यावर 'कॅट-वॉक' करत चालताना मिळणारा आनंद शब्दांत मांडणे कठीण आहे.
कधीतरी जॉगिंग ट्रॅकवर 'व्हिटॅमिन डी' मिळवण्याच्या बहाण्याने सूर्योदय आणि निसर्गाचे स्थित्यंतर पाहता यावे म्हणून मुद्दाम वाढीव फेऱ्या मारल्या जातात. असूनही कुठे भातुकलीची भांडी दिसली की मन वेडावते. बागेत गेल्यावर एखादे पांढरे फूल तोडणे, ते कोमेजून जाणार हे माहीत असतानाही त्याची अंगठी करून बोटात मिरवणे, ढगांमध्ये वेगवेगळे आकार शोधणे किंवा अचानक आनंदाने गाणे गुणगुणणे...हे सर्व माझ्यासाठी यंत्र होण्यापासून वाचवणारे 'रिफ्रेश बटन्स' आहेत. तारक मेहता बघताना किंवा मनात साचलेले विचार कागदावर उतरवताना हरवलेले काळ-वेळाचे भान हे तंत्रज्ञानापेक्षा मनाच्या संप्रेषणाशी जास्त निगडित आहे, असे मला वाटते.
हे वेंधळेपण म्हणजे केवळ विसरभोळेपणा नाही, तर ते एक साधन आहे; एका समाधानी, शांत, शुभ्र आणि निरागस स्वत्वापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम. आपण कोण आहोत, कसे आहोत आणि असेच का आहोत, या गूढ प्रश्नांची उत्तरे मला जगाच्या शहाणपणात नाही, तर माझ्या या स्वच्छंदी वेडेपणात सापडतात.
म्हणूनच म्हणावेसे वाटते,
जगरहाटीचा गोतावळा शहाणपणाचा सोहळा
नियम-चौकटीत बंदिस्त जखडून मानव त्रस्त
एकांताच्या सोवळ्यात फुलला विचारांचा मेळा
स्वत्वभरारी घेण्या वेंधळ्या मनाचा वरदहस्त


Comments
Post a Comment