पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...

शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत वह्यापुस्तकांचा कप्पा आवरणे म्हणजे आठवणी, गंमतजंमत, पेन-पेन्सिलचे संच या निकषांच्या आधारावर सरत्या वर्षाचा आलेख रेखाटण्याचा कार्यक्रम असायचा. शाळा संपली तशी खाकी कव्हर घातलेल्या वह्यांची जागा printouts, highlighters, sticky notes यांनी घेतली. या प्रवासात जास्त वेळ लागतो तो पुस्तकांचा कप्पा आवरताना. त्या गराड्यात एकदा शिरले की बाहेर येण्यास मन मानत नाही. पुस्तकांसमवेत भरणारी सभा मन मोहून टाकते. कागदाच्या जंगलातून येणारा सुगंध प्रत्येकवेळी तितक्याच ओढीने स्वतःकडे आकर्षून घेतो. 

तशी माझ्याकडे bookshelf लागेल एवढी पुस्तके नाहीत. जी आहेत त्यांचा गंध मन प्रफुल्लित करतो. काही पुस्तके वारंवार वाचली आणि काही निव्वळ सुशोभीकरणासाठी आणल्यासारखी वाटतात. पुस्तके म्हणजे विचार आणि दृष्टीसाठी मेजवानी; मग त्याला सुगंधाची जोड का असते हा प्रश्न कित्येकदा सतावतो. 

वैज्ञानिकदृष्ट्या कागदांमधून येणारा वास म्हणजे लिग्निनची जादू. एक वाचक म्हणून विचार केला तर पुस्तकांच्या प्रत्येक पानातून येणारा सुवास म्हणजे पहिल्या पावसात चिंब भिजलेल्या मातीच्या मृद्‌गंधासमानच! मृद्‌गंध नवचैतन्य निर्माण करते आणि पुस्तकांची दरवळ ज्ञानाची प्रतिभा रेखाटते.

सुगंधाची ही काडी म्हणजे शब्दसंपत्तीचे क्रीडांगण! हा सुगंध केवळ कागदाचा नसतो तर कागदासोबत जोडल्या गेलेल्या आठवणी, विचार, प्रत्येक ओळ वाचताना मनात उद्भवणाऱ्या भावना, उलगडत जाणारे व्यक्तिचित्रण व जोडीला असलेला सुखद एकांत यांचा संगम. आईबाबांनी जमवलेली जुनी पुस्तके वाचताना हा संगम अनुभवता येतो. तर मी नव्याने जमवलेली पुस्तके उघडताना येणारा उत्साहवर्धक सुवास नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरतो.

सुगंध म्हटले की आपल्याला आठवते ती अत्तराची कुपी. कुपीतील अत्तर संपले की तो सुगंध देखील संपतो. म्हणजेच हा सुवास क्षणिक असतो. याउलट एखादे पुस्तक आपण जितक्या वेळा उघडू तितक्या वेळा निर्माण होणारी विचारांची लय प्रत्येक भेटीगणिक दृढ होत जाते. म्हणूनच पुस्तकांना 'वाङ्मय व शब्दकोशाची अविरत सुगंधित असणारी कुपी' म्हणता येईल. सुधा मूर्तींचे 'Grandma's Bag of Stories', पु. लं.चे 'व्यक्ती आणि वल्ली' ही दहावीच्या सुट्टीत वाचलेली पुस्तके आज वाचताना लेखकांनी रेखाटलेली पात्र अजूनही तितकीच जिवंत पण अधिक जवळची वाटतात. 

अत्तराच्या विविधतेप्रमाणेच पुस्तके वैविध्याच्या घमघमाटाने नटलेली असतात. प्रकाश आमटेंच्या 'प्रकाशवाटे'तून निःस्वार्थ सेवा दरवळते; तर कलामांचे 'अग्निपंख' ध्येयपूर्तीचा सुगंध पसरवतो. कित्येकदा पुस्तकात सापडणारे मोरपीस, सुकलेले फूल, एखादी चिठ्ठी आठवणींना साद घालते. ​

डोंबिवलीतील फ्रेंड्स लायब्ररी तर्फे राबवण्यात येणारे वार्षिक पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन म्हणजे वाचन कलेची दरवळ अत्र, तत्र आणि सर्वत्र पसरवण्याचा दुवा आहे. या देवाणघेवाणीतून आपण अनुभवाचा सुवास विस्तारत जातो. 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मी अनेकदा PDF स्वरूपातही पुस्तके वाचली आहेत. परंतु Digital highlightersऐवजी एका हातात पेन्सिल आणि दुसर्‍या हातात खोडरबर व समोर पुस्तक असा साज आपुलकीची उब देतो. डिजिटल पुस्तके वाचायला शिकवतात, पण कागदी पुस्तके वाचन अनुभवायला शिकवतात.

शालेय जीवनात मी वापरलेल्या सेकंड हँड पुस्तकांचा वास मला दोन अदृश्य आणि अनोळखी व्यक्तींना जोडणारा दुवा वाटतो. तसेच आज वाचत असलेली शैक्षणिक पुस्तके मला भविष्याचा सुवास शोधण्यास प्रवृत्त करतात. ही पुस्तके आपल्या स्वप्नांचे साक्षीदार असतात. फाटलेली पाने, त्यावर सांडलेली शाई हे आपल्या कष्टांचे परफ्यूम बनतात.

माणूस सोडून जातो, वास्तू पडतात, काळ बदलतो...पण पुस्तकाच्या पानांमध्ये असणारा सुगंध आणि त्यातील शब्द अजरामर राहतात. कारण जशी 'मुले ही देवाघरची फुले' असतात, तशीच पुस्तके म्हणजे ज्ञानसाधनेच्या वेदीवर अर्पण केली जाणारी फुले आहेत! ही फुले कधी कोमेजत नाहीत; त्यांचा सुवास काळानुरूप अधिकच प्रगल्भ होत जातो.



Comments

Popular posts from this blog

मतदान कक्षातील बाकावरून

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण