डोंबिवली - सीएसएमटी - डोंबिवली
सकाळी ८ची वेळ. पावसातून वाट काढत रेल्वे स्थानकावर पोहचून तिकीट काढले. प्रवास सुरु करण्यासाठी पुलावर चढताच दररोजप्रमाणे सकाळची आणि त्यातही डोंबिवलीची गर्दी मी पुन्हा नव्याने अनुभवत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर आलेल्या गाडीमध्ये चढण्यासाठी लोकांनी केलेली घाई आणि त्यातून शांतपणे रस्ता काढणारी मी हे समीकरण वेगळेच होते. कारण एवढेच की तेव्हा मला गाडी पकडण्यापेक्षा स्वतःला सावरणे गरजेचे होते. हातातील छत्री, नुकतेच काढलेले जपून ठेवायचे तिकीट आणि ओले झालेले दप्तर व कपडे सांंभाळताना माझी त्रेधातिरपीट उडाली होती. माझी आवराआवर आटपायला आणि पुढील गाडी यायला एकच वेळ झाली. पूर्ण तयारीनिशी गर्दीतून गाडीत चढले आणि समाधानाचा निःश्वास सोडला.
थोड्या वेळाने मला खिडकीची जागा मिळाली. खिडकीतून येणारा गार वारा आणि पावसाने बहरलेला हिरवागार निसर्ग यांनी तर मला कधीच दुसऱ्या विश्वात पोहचवले होते. तिथे होते ती फक्त मी आणि नीरव शांतता. अचानक बाजूने गेलेल्या ट्रेनमुळे शांततेत भंग पडला आणि मनात विचारांचा कल्लोळ माजला. क्षणात रेल्वेच्या सार्या आठवणी ताज्या झाल्या. एकदा दादर स्थानकावरील गर्दी पाहून पुन्हा तिथे न जाण्याची बालवयात घेतलेली प्रतिज्ञा ते तेवढ्याच गजबजलेल्या डोंबिवलीतील फलाटांवर ट्रेनसाठी उभे राहणे सारे काही आठवले.
घरापासून १५ मिनिटांवर असलेल्या शाळेची दहा वर्षे पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दीड तासाचा ट्रेनचा प्रवास करून महाविद्यालयात जाण्याचा निर्णय माझाच होता. पुढे आयुष्यात खूप बदल होणार होते. त्यांना सामोरे जाण्यास मी सज्ज झाले आणि त्याची सुरुवात ट्रेनच्या प्रवासाने झाली. ट्रेनच्या प्रवासाने मला खूप काही शिकवले. शिकता शिकता आणि अनुभव घेताना सगळ्या गोष्टी कधी सहज आणि सोप्या झाल्या ते समजलेच नाही.
एकदा गाडीत शिरलो की काही काळापुरते राहणार असलेल्या या नव्या विश्वात आपण फक्त आपलेच असतो. तिथे सर्वकाही वेगळे असते. त्यात आपल्याला अस्तित्व निर्माण करावे लागते; फक्त आपल्यासाठी! लहानपणी गोंडसपणामुळे सहज मिळणारी खिडकी आणि आता हिरवीगार सृष्टी बघण्यासाठी खिडकीची स्पेशल जागा मिळवताना होणारी धडपड यातील तफावत लगेच लक्षात येते. इथे आपल्याला पहिला धडा मिळतो तो म्हणजे स्वावलंबी होण्याचा; स्वतःसाठी उभे राहण्याचा. आयुष्यात पुढे या गोष्टीचा आपल्याला खूप उपयोग होणार असतो. फुलपाखराप्रमाणे संरक्षित कोषातून बाहेर पडून स्पर्धात्मक जगामध्ये वावरण्याची ही सुरुवात असते आणि आपल्या जडणघडणीत तिचे योगदान मोलाचे ठरते.
आयुष्य ही एक सदैव तरंगणारी नौका असते. आपण तिचे नावाडी असतो. ज्याप्रमाणे तरंगणारी नौका आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी बेटाच्या शोधात असते; त्याप्रमाणे आपणही अशाच बेटाच्या शोधात असतो, तो म्हणजे आपला समाज जो आपल्याला आपल्या नजरेने न्याहाळायचा असतो. ट्रेनच्या प्रवासात आपण समाजाचा जवळून अनुभव घेत असतो. ही जागा विविध गोष्टींनी भरलेली असते. मनुष्यजीवनातील विविध पैलू इथे दिसून येतात. नवीन असताना आपुलकी दाखवणाऱ्या ताईंपासून थोड्याशा धक्क्यामुळे रागावणार्या काकूंपर्यंत सारेच भेटतात आणि रोज अनुभवाचा नवा धडा देऊन जातात. एकाच ट्रेनमध्ये असणार्या रोजच्या काकू कधी आपल्या मैत्रिणी बनून जातात ते समजतही नाही. त्यांनी आपल्याबरोबर वाटलेला खाऊ खाताना आबसूकच शाळेच्या मधल्यासुट्टीची आठवण येते. त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण आजच्या धकाधकीच्या भविष्याच्या चिंतेने ग्रस्त असलेल्या जीवनात वर्तमानातील आनंद टिपण्याची उमेद देतात. या नवीन माणसांमुळे आपल्या अनुभवाची शिदोरी विस्तारत जाते. त्यात गजरा बनवणाऱ्या, स्वेटर विणणार्या आणि भाजी निवडणार्या काकूंची गर्दी असते ती वेगळीच!
आपले दप्तर सामानाच्या जागेवर ठेवण्यासाठी केलेली विनवणी ते जागा असतानाही दप्तर न ठेवल्याने होणारा वाद अशा सर्व गोष्टी आपण अनुभवतो. चूक नसताना वाद झाला की आपल्या बाजूने बोलणाऱ्या काकू आपुलकीची ऊब देतात. एखादे वेळी अचानक टीसी आल्यावर लोकांचा उडणारा गोंधळ कायम नियमांचे पालन करण्याची आठवण करुन देतो. रोजच्या जाण्यायेण्याने ट्रेन आपले नवे घर बनून जाते. कॉलेजमधील बहुतांश ओळखी ट्रेनमुळेच होतात. म्हणूनच एखाद्या वेळी हा प्रवास नाही केला तर चूकचूकल्यासारखे होते. पावसात अडकलेली रेल्वे भीती व तणाव दोन्हीचा अनुभव देते. हे किस्से आई-बाबांना सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अपत्याची काळजी व अभिमान दर्शवतात.
एका गोष्टीची आवर्जून नोंद करावी ती म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचा भेदभाव दिसून येत नाही. अमूकअमूक जात आणि अमूकतमूक भाषा असा फरक कधीच केला जात नाही. उलट दोन मिनिटांसाठी का होईना परंतु पाठ टेकवायला जागा मिळते. संकटाच्यावेळी धीर देणारी आपुलकीची माणसे मिळतात. अशावेळी एकात्मता दिसते. एकाच स्थानकावर उतरताना आपल्या सहप्रवाशांना एकत्र घेऊन जाताना सहकार्य व इतरांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याची भावना दिसते. फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास हा वेगळेपणा असला तरी मूळ हेतू एकच असतो...आजच्या स्पर्धात्मक जगात आपली जागा निर्माण करणे व यशस्वी जीवन जगणे.
डोंबिवली-सीएसएमटी-डोंबिवली या प्रवासाने मला खूप काही शिकवले. नागरिकशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांतून पाठ केलेले नियम प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळाली. स्वावलंबन, दक्षता, जगण्याची नवी उमेद.....कितीही लिहिले तरी ही यादी पूर्ण होणार नाही. "माणूस जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात शिकतो", असे म्हणतात ते काही उगीच नाही.
आपल्या विचारात गुंग असतानाच बाजूने "आप किधर हो?" असा आवाज आला. त्याला उत्तर म्हणून "लास्ट" असे सांगून मी सज्ज झाले आणखी नवीन अनुभव घेण्यासाठी!
true story of every dombivlikar ❤❤❤
ReplyDeleteKhupch chaan!
ReplyDeleteSahi tha Kartiki 😃😃
ReplyDeleteThank you so much😊
DeleteNot only Dombivlikars but also all the Mumbaikars can relate with it!!!���� KEEP POSTING BLOGS LIKE THIS☺☺..nice work.
ReplyDeleteThanks a lot☺️
DeleteNice article Akkaa
ReplyDeleteThank you so much
Delete