नवीन भाषा शिकताना


          "अगं, तुझ्या आईला काय म्हणालीस तू आता?", "आमची तक्रार केलीस ना?" आणि अर्थात "तुझी भाषा शिकव ना आम्हाला!"
          हे आणि असे भरपूर प्रश्न नेहमीच माझ्या कानावर पडतात. आता तर असं काही ऐकू आला नाही तर मला कसंसच होतं.
          माझी मातृभाषा तेलुगू. पण मुळात जन्म आणि आत्तापर्यंतचे आयुष्य महाराष्ट्रात राहिल्यामुळे व मराठी माध्यमाच्या शाळेत असल्याने मराठी मला मुखोद्गतच होती. पण म्हणून तेलुगू येत नाही असे नाही. पण मी माझ्या भाषेत बोलताना आजूबाजूला हसण्याचे आणि विनोदी असे येणारे आवाज अजूनही त्रास देतात.
          तसं पाहिलं तर भाषा हे आपला संदेश समोरच्या व्यक्ती किंवा समुदायापर्यंत पोहोचवण्याचे अगदी प्रगत माध्यम. केवळ लहान मुलंच नव्हे तर आदिमानवापासून सर्वच सुरूवातीला इशारे, क्रिया, हालचाली व कृतींद्वारे संवाद साधतात. पूर्वी माणूस कदाचित आकृती मधून बोलत असावा. याची प्रचिती आपल्याला गुहाचित्रांतून येतेच. त्याप्रमाणेच लहान मूल रडून आणि डोळ्यांद्वारे संवाद साधते. म्हणतात ना, 'माणसाचे डोळे बोलतात.' म्हणजेच डोळ्यांना देखील भाषा असते. एकवेळ डोळ्यांची भाषा चुकू शकते. पण आपण बोलणारी भाषा समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला हवा तो संदेश योग्य प्रकारे पोहोचवते. म्हणूनच मूल जेव्हा बोलायला लागते तेव्हा भाषेद्वारे ‌संवाद अधिक सोपा बनतो.
          म्हणजेच भाषा हे विचारांच्या देवाणघेवाणीचे उत्तम साधन आहे. मी सुद्धा तेलुगू, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषा शिकले. त्या समजताना, चुका करताना व याच चुका सुधारताना मजा येते. ही गंमत भाषा शिकण्यात रस निर्माण करते. शाळेत असेपर्यंत वर नमूद केलेल्या भाषा मी शिकले.
          महाविद्यालयाचा प्रवास सुरू झाला आणि विषय म्हणून भाषा निवडीची संधी मला मिळाली. मी कला शाखेत प्रवेश घेतल्याने खूप जणांनी‌ मला परदेशी भाषा शिकण्याचा सल्ला दिला. भाषा निवडीचा पर्याय सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना होता. मग फक्त मला असे का सांगितले जात होते ते आजतागायत मला कळलेले नाही. कळले तर बरेच होईल! माझी जिज्ञासेची क्षुधा शांत होईल. पण 'करियरचा पर्याय' असे उत्तर नसावे ही अपेक्षा!
          माहिती तंत्रज्ञान या विषयाशी माझा संबंध येत नसल्याने हा पर्याय माझ्यासाठी आपोआपच बंद झाला. आता माझ्याकडे हिंदी आणि फ्रेंच हे दोन पर्याय होते. मला काहीतरी नवीन व वेगळे शिकावे असे वाटत होतेच. माझे महाविद्यालय‌ त्यासाठी प्रसिद्ध आहेच! तसेच मी घेतलेले विषय थोड्या अधिक प्रमाणात माझ्या परिचयाचे होतेच. म्हणून नवीन शिकावे यासाठी मी फ्रेंच भाषा निवडली.
          फ्रेंचची बाराखडी माहित नसताना या समुद्रात पोहणे म्हणजे साहसच होते. पण हा सागर पार करण्याचा मी निश्चय केला आणि या नवीन अनुभवासाठी सज्ज झाले. सुरुवातीला काहीच समजले नाही. पहिल्या दिवशी जेव्हा मला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तर माझी पळता भुई थोडी झाली. कारण प्राध्यापक जे शिकवत होते केवळ त्याचे भाषांतर मला समजत होते. माझ्या मेंदूने एक गोष्ट साठवेपर्यंत समोर दुसरी गोष्ट उभी राहिली होती. सुरुवातीचे काही दिवस कठीण होते. कधीकधी डोकं एकदम सुन्न व्हायचे‌. तासामध्ये काय घडत आहे हे लक्षात यायचेच नाही. पण नंतर प्रगती होत गेली. आता मोबाईल आणि इंटरनेट यांची मदतही होत होती. पण अजूनही काहीतरी कमी आहे असे जाणवत होते.
          अकरावीत सोप्या गोष्टी असल्याने कसेबसे वर्ष सरले. थोडेफार फ्रेंच मी शिकले होते. पण बारावीत गेल्यावर एक धक्काच मिळावा असं म्हणावं लागेल. पाया भक्कम असल्याशिवाय इमारत उभी राहू शकत नाही. त्याप्रमाणेच भाषेचा पाया भक्कम असल्याशिवाय सराईतपणाची इमारत उभी राहू शकत नाही. म्हणजेच मी फ्रेंच शिकले असं मला वाटत होतं. ते खरेच आहे. पण म्हणतात ना 'अर्धवट ज्ञान घातक ठरते.' असेच माझ्या बाबतीत घडले. मी भाषा शिकले पण तिचा पाया असलेली बाराखडी व उच्चार या गोष्टी अजूनही कच्च्या होत्या. याची प्रचिती आल्यावर समजले की हीच कमतरता होती जी आत्तापर्यंत माझ्या लक्षात येऊ शकली नाही.
          आता मी कामाला लागले पण बारावीच्या तयारीत मला इकडे जास्त वेळ देता आला नाही. प्राध्यापकांच्या मदतीने गोष्टी सोप्या आणि सरळ झाल्या. माझ्यावरचा ताण हलका झाला. पण पोपटपंचीला काही मला निरोप देता आला नाही. बारावीची परीक्षा अर्धे पाठांतर व अर्धे मी शिकलेले अशा पद्धतीने दिली. कदाचित पेपर सोपा होता म्हणून मला भाषेचा वापर करता आला. दोन वर्षांतून पहिल्यांदाच भाषा शिकल्याचा खरा आनंद मला‌ झाला.
          नंतरच्या चार महिन्यांच्या सुट्टीमध्ये मी फ्रेंच भाषेत प्रगती करण्याचा व ती सुधारण्याचा उपक्रम हाती घेतला. यात मी काही अंशी सफल झाले. यामुळेच पुढच्या वर्षी म्हणजे आत्ताच्या वर्षात मी फ्रेंच भाषेचा पुढचा टप्पा नीट पार करु शकले. पण अस्खलित असे फ्रेंच ऐकण्यात व मला‌ हवी असलेली उत्तरे शोधण्यात माझा चांगलाच कस लागला होता.
          अकरावीत झालेल्या चुकीला मी पूर्णतः शिक्षकांना दोषी मानत नाही.(त्यांनी भाषेची बाराखडी समजवायला हवी होती.) कारण कुठेतरी स्वअध्ययनात मी सुद्धा चुकले होते. नवीन आहे म्हणून समजत नसेल, हळूहळू कळेल या भ्रमात मी माझा वेळ घालवला, याची मला खंत वाटते.
          आयुष्य ही अनुभवांची शिदोरी असते. या शिदोरीतला मेवा केवळ आस्वाद घेण्यापुरताच नव्हे तर जतन करण्यासाठी देखील वापरावा. नवी भाषा शिकताना मिळालेला अनुभवरुपी मेवा मी कायमच जतन करून ठेवेन.
          माणूस जीवनभर विद्यार्थ्यांच्या भूमिकेत कार्यरत असतो. यावेळी तो नवनवीन गोष्टी शिकतो. त्यात येणारे चढ उतार खूप काही शिकवतात. नवीन भाषा अभ्यासताना मी व्याकरणासोबतच नियोजन, धैर्य आणि चिकाटी अशा अनेक गोष्टी नव्याने शिकले. यातूनच माझा हा प्रवास फुलत गेला व माझ्या आयुष्याच्या अनुभवांच्या शिदोरीत नवा खजिना जमा झाला.
          À la fin une nouvelle langue est une nouvelle vision de la vie.
J'ai vécu la même chose.
Le français a enrichi ma vie avec de nouvelles expériences et apprentissages.
(नवीन भाषा म्हणजे जीवनाची नवीन दृष्टी. ही गोष्ट मी सुद्धा अनुभवली. फ्रेंच शिकण्याने माझ्या आयुष्यात नवीन अनुभवांची भर पडली.)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मतदान कक्षातील बाकावरून

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...