वेध 'स्वत:'चा
अपना टाईम आएगा!
लॉकडाऊन असताना नित्यनेमाने १५ जूनला माझी शाळा ऑनलाईन तासिका घेणार हे समजल्यावर ही ओळ काही माझा पिच्छा सोडायला तयार नाही. याचे कारण म्हणजे माझ्यापासून दुरावलेला 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' असा रेल्वेप्रवास आणि जे आता दुसरं घर बनले आहे त्या महाविद्यालयाच्या आवारात नव्या आठवणी निर्माण करण्यासाठी आतुर झालेले माझे मन!
मनाचा थांगपत्ता लागत नाही, ते खरेच! या काळात ते मला प्रकर्षाने जाणवले. दिनक्रमाची तर पुरती बोंब लागली आहे. पण दिनचर्या चुकली म्हणजे जीवन चुकते असे नाही ही बाब देखील मला या काळातच जाणवली. आता काय करायचे? आपला वेळ कसा घालवावा? या विचारांनी सुन्न होणार्या मनाची जागा नवीन काहीतरी करावे ही कल्पना कधी व्यापून टाकेल ते मला आजतागायत उमगले नाही. चंचल मनाची ही घालमेल रोज सतावते. परंतु तीच या त्रासावरचे औषधसुध्दा बनते. हे औषध म्हणजे मी स्वतःचा नव्याने घेतलेला शोध!
ऑनलाईनच्या विळख्यात आज आपण स्वतःला असे काही जखडून घेतले आहे की त्याला कुठेतरी ब्रेक मारणे गरजेचे होते. आपल्याला मिळालेली अनिश्चित सुट्टी ही गोष्ट प्रकर्षाने आपल्या दृष्टीस आणते. म्हणूनच नकळत का होईना पण मी या online चक्रातून स्वतःला बाहेर काढले आणि आपल्या माणसांच्या सहवासात या वेळेचे सोने केले! अर्थात तंत्रज्ञानाच्या युगात ते पूर्णतः जमले असे नाही. कारण ही काळाची गरज मला नवनवीन गोष्टी शोधण्यास व तिथे आपला कस लावण्यास भाग पाडत होती. यातून नावीन्याची सकारात्मकता जाणवली. त्याच क्षणी समाजमाध्यमांवर आपल्याला मिळणारे व आपण केलेले लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी दिसणारी चढाओढ गौण वाटू लागली. कारण आता तिची जागा आईच्या मायेची ऊब, वडिलांचे अदृश्य प्रेम आणि भावाचा बहिणीप्रती असलेला जिव्हाळा यांनी घेतली. आपल्या माणसांच्या सहवासात आणि ऑनलाईन जगाने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा ताळमेळ साधत स्वविकसनाचा पाया अगदी घट्ट रोवला गेला.
आज ३ महिने मागे वळून पाहिले की मनोमन आयुष्याचा सिनेमा उभा राहतो. या सिनेमाची सर्वेसर्वा मीच आहे आणि मला आलेला प्रत्येक अनुभव हा एक नवा प्रसंग आणि मला भेटलेली प्रत्येक व्यक्ती माझा सहकलाकार बनतो.
शाळेत असताना सुध्दा एवढी मोठी सुट्टी मिळाल्याचे मला आठवत नाही. दरवर्षी जिची आपण विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतो त्या उन्हाळ्याच्या वाढीव सुट्टीने आपल्या मनसोक्त विहारावर गदा आणली हे जेवढं खरं त्याप्रमाणे तिने 'स्व'च्या शोधासाठी मिळवून दिलेली मोकळीक त्याहून खरी आणि मुख्यतः प्रामाणिक!
ही मोकळीक जितकी खरी तितकाच कॉलेजच्या बेलचा होणारा भास!
खरंच ! सुंदर लिहिलं आहेस ❤
ReplyDeleteमराठी भाषेतील सर्व शब्दांचा पुरेपूर उपयोग केला आहेस.....
ReplyDeleteखूपच सुंदर ,👌👌👌👌👌
Mast likha hai Kartiki ❤❤. Keep going like this 😀😀
ReplyDelete