एक नवी वाटचाल

 २०-२० क्रिकेटची मॅच बघत आपण २०२०च्या वर्षात पोहोचून आणखी एका ग्रेगरियन दशकपूर्तीकडे कधी वळलो, हे लक्षात आले नाही. १ जानेवारी २०२०च्या सकाळी नव्या उमेदीने सर्वजण नवक्षितीजाची गवसणी घालण्याच्या प्रयत्नात असतानाच काळाच्या उदरात काहीतरी वेगळेच दडले होते.....

शेवटी कॉलेज सुरू झाले. आता कुठे माझ्या महिनोंमहिने निश्चल पडलेल्या जीवनाची गाडी पूर्वपदावर येणार होती. आजची सकाळ नावीन्याने भरून गेली आणि याच सकारात्मकतेची सोबत घेऊन मी घराबाहेर पडले. स्टेशनवर पोहोचल्यावर माझी मैत्रीण दिसली. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही एकमेकींना बिलगलो.

अचानक माझे डोळे उघडले. काळीज धस्सं झालं होतं! मनात भीतीचे ठोके धडाधड वाजत होते. काहीच सुचेनासे झाले. भानावर आले तेव्हा समजलं, मी स्वप्नात होते.

या स्वप्नाची भीती का वाटावी याचं आश्चर्य वाचकांना नक्कीच वाटणार नाही. कारण संपूर्ण जग आज काळाच्या उदरात दडलेल्या अशा परिस्थितीच्या विळख्यात सापडले आहे ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सामाजिक अंतरीकरणाचे धडे गाठीशी घ्यावे लागले आहे. माणसापासून दुरावा राखणं हाच जीवनच मंत्र बनला आहे. 

हा विळखा म्हणजे कोरोना नामक विषाणूचा संसर्ग ज्याने काही महिन्यांपूर्वी जगाला ठप्प केले होते. यावर उपाय म्हणून लॉकडाऊन नावाच्या बाणावर सोसायटीला लावलेल्या कुलूपाची प्रत्यंचा चढवली. कदाचित हा नेम चुकला! कुलूप शोपीस बनले आणि आपल्यासाठी असलेल्या नियमांची आपल्यातीलच काही घटकांनी खिल्ली उडविली.

याचेच उत्तर म्हणून माणसाने स्वतःला चार भिंतींमध्ये बंदिस्त बनवून ठेवण्यात समाधान मानले. या कोषातून कधीतरी बाहेर पडायचे होतेच. अंशात्मक अनलॉक व त्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्राचे 'मिशन बिगीन अगेन' हा याच अनावरणाचा टप्पा ठरला आणि आज आपण २०२१च्या पहिल्या दिवशी जगावरील संकट आणि मनातील अनिश्चिततेचे अनावरण करण्याचा सकारात्मक संकल्प केला. 

कोरोना विषाणूसोबत जगणे अटळ आहे ही गोष्ट लक्षात येताच आपल्या जीवनाला नवी दिशा मिळाली. ही दिशा दाखवेल तशी भ्रमंती करून आपण सर्वांनीच २०२०चा नकोसा वाटणारा टप्पा पार केला. ध्येयपूर्तीच्या मार्गावर स्वसंरक्षणानिमित्त सोबत घेतलेली ढाल (मास्क आणि सॅनिटायझर) आजपर्यंत आपले रक्षाकवच बनली. 

आजचे मानवी जीवन काही प्रमाणात निराळे बनले आहे. चेहर्याचे रक्षण करण्यासाठी तोंडभरून मास्क बांधून फिरणार्या ज्या मुलींना आपण आतंकवादी म्हणून हिणवायचो, त्यांची हीच सवय काळाची गरज बनली. आई-वडिलांनी शिकवलेले स्वयंशिस्तीचे धडे आपलेसे वाटू लागले. घराबाहेर, आजूबाजूच्या व्यक्तीकडे प्रत्येकजण संशयात्मक नजरेने बघू लागला परंतु याच दुरावलेल्या माणसाला माया, कठोरता, जिव्हाळा आणि प्रेम या चार भिंतींवर भक्कमपणे उभ्या असलेल्या घराने आपुलकीची ऊब दिली.

'कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन!' या टिळकांच्या गर्जनेप्रमाणे कोरोनावर मात करण्यासाठी आज जगाने एक नवी वाटचाल अवलंबिली आहे. एक असा मार्ग जिथे तंत्रज्ञान जे एरवी शाप की वरदान या बेडीत जखडलेले असते आपल्यासाठी वरदान ठरले आहे. कदाचित या वरदानाचा देखील एखादा कालावधी असेल!

माणसाबरोबरच वरदान ठरलेल्या तंत्रज्ञानाची सुध्दा आता परीक्षा होईल आणि शाप की वरदान यांपैकी कोणते पारडे जड हे येणारा काळच ठरवेल. लॉकडाऊनच्या उत्तरार्ध मिळालेली अनिश्चित सुट्टी जी रामबाण उपाय ठरली, तिने स्पर्धात्मक युगातील चढाओढीच्या अमर्याद गर्तेतून माणसाला स्व-शोधाचा आणि निरोगी व उत्तम मानसिक स्वास्थ्याचा मार्ग मिळवून दिला. या काळात आपल्या माणसांच्या सहवासात, स्वतःकडे जातीने लक्ष देत माणसाने मिळालेल्या संधीचे सोने केले. याच्या उत्तरार्ध आज कोरोना रूग्णसंख्येचा चढ-उतार पार करत आपण तंदुरुस्त लोकसंख्येचा पाया रोवला. परंतु तंत्रज्ञानाचा अविरतपणे होणारा वापर चंचल मानवी मनाला तंदुरुस्त ठेवणार की शापाचे पारडे जड राहणार हे जाणून घेणे निश्चितच एक नवा दृष्टिकोन देऊन जाईल.

अर्थकारणाचे चक्र चलन नावाच्या इंधनासोबतच कर्तृत्ववान मनुष्यबळाच्या पाठिंब्यावर चालते. हा गाडा असाच फिरता राहावा यासाठी सजग पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. म्हणूनच ऑनलाईन शिक्षणाद्वारे आपली शिक्षण पद्धती भक्कम बनवणे काळाची गरज बनली आहे. उद्या उचित नियोजनातून ऑनलाईन शिक्षण अमलात येईल. यात शैक्षणिक संस्थांप्रमाणेच समाजमाध्यमांवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी दिसणारी चढाओढ आणि आंतर्जालावर उपलब्ध असलेली ज्ञानाची कवाडे यांच्यात योग्य निवड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थीवर्गाचा प्रयत्न स्वागतार्ह असेल.

'न भूतो न भविष्यति' असा हा नवा अनुभव प्रयत्नांनी साध्य होईल पण माणसामाणसांतील अंतर कुठेतरी वाढलेले असेल. मनात भीती आणि शंकेची पाल कायम चुकचुकणारंच! या परिस्थितीतूनही मार्ग शोधून प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच असेल. उद्याच्या नवीन जगात शासन आणि जनता यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता भासेल. हे घटक एकत्र आले की संकटाची वाटदेखील आपण यशस्वीरित्या पार करू शकू. 

'तमसो मा ज्योतिर्गमय' या उक्तीप्रमाणे कोरोनाच्या अंधारातून उद्याच्या तेजस्वी प्रकाशाकडे नेणारी ही नवकिरणे म्हणजे आपल्यासाठी एक नवे पर्व असेल. यातील काही गोष्टी आपल्याला हव्या असतील तर काही गोष्टी नकोशा वाटतील. परंतु या सर्वांचा समतोल साधत २१वे शतक नवी वाटचाल सुरू करेल ज्याचे आपण सर्वच सहभागी आणि साक्षीदार असू. चला तर मग साक्षीदार बनूया या नवक्षितीजाचे!

Comments

  1. मस्त लिहिले आहेस,अशीच लिहीत रहा..👍

    ReplyDelete
  2. सर्वांचे खूप खूप धन्यवाद😊🙏🙏

    ReplyDelete
  3. खुपच छान लिहीले आहेस 👌👌👌

    ReplyDelete
  4. khup sundar lekh..keep writing!

    ReplyDelete
  5. खूपच छान,सुंदर👌👌

    ReplyDelete
  6. Khupach uttam lihila ahe.Asach lihit raha 🤗

    ReplyDelete
  7. Khupach uttam lihila ahe.Asach lihit raha 🤗

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मतदान कक्षातील बाकावरून

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...