Xavier's: 'आजी' ते 'माजी'चा प्रवास!
विद्यार्थीदशा म्हणजे 'गिली मिट्टी को साचे में ढालने का समय' असं मी एका videoमध्ये ऐकलं होतं. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम करणारा कुंभार बदलतो. आतापर्यंत घर, शाळा आणि मी या comfort zoneमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या कोषातून बाहेर पडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःलाच स्वतःचा कुंभार बनावे लागते. त्याला साथ देण्यासाठी असणारे चाक देखील तोच निवडतो. हे चाक म्हणजे महाविद्यालय! असाच क्षण माझ्याही आयुष्यात आला आणि चाक निवडण्याच्या टप्प्यात मी यशस्वी ठरले, असेच म्हणेन. माझे हे चाक म्हणजे St. Xavier's College जिथे मी २०१७-२०२२ असा पाच वर्षांचा अविस्मरणीय काळ घालवला. College life म्हटलं की चित्रपटांच्या तथाकथित दुनियेनुसार निव्वळ टिंगलटवाळी करण्याचे स्थान हा संभ्रम आजही कित्येकजण बाळगतात. परंतु तो टप्पा पार करताना मौजमजेसोबत, शिक्षण आणि अनुभवाच्या धड्यांतून माणूस जगाला सामोरे जाण्यासाठी तयार होतो, हे नक्की!
१०वी नंतर पुढील शिक्षणासाठी शाखा व college निवडताना मला पहिली शिकवण मिळाली ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे! (पालकांची साथ हा विश्वास आणखी दृढ बनवते) मी Arts निवडले हे समजल्यावर आणि त्यातही St. Xavier's College निवडले हे ऐकल्यावर मिश्र प्रतिक्रिया आल्या. पण आजही वाईट या गोष्टीचे वाटते की यापैकी प्रश्नार्थक प्रतिक्रिया अधिक होत्या. आणि या प्रतिक्रिया खोडून काढण्यात मला नक्कीच यश मिळाले. Ruia की Xavier's या संभ्रमातून शेवटच्या क्षणी formवर first preference म्हणून Xavier's हे नाव टाकण्यापासून माझा नवा प्रवास सुरू झाला. महाविद्यालय कसे असते हे माहीत नसताना नव्या उमेदीने admissionला गेल्यावर पहिल्यांदा पाहिलेली Xavier'sची छबी मनात घर करुन गेली. चित्रपटांमधून पाहिलेल्या shooting locations पैकी एका ठिकाणी मी पुढील शिक्षण घेणार या भावनेने मन आनंदून गेले. सोबतीला अदृश्य भीती आणि उत्साह होताच!
घरापासून १५ मिनिटांवर असलेल्या शाळेची दहा वर्षे पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दीड तासाचा ट्रेनचा प्रवास करून महाविद्यालयात जाण्याचा निर्णय माझाच होता. डोंबिवली ते सीएसएमटी हा प्रवास करून FYJCच्या पहिल्या दिवशी एकटीने ब्रिटिशकालीन दगडी बांधकाम असलेल्या वास्तूमध्ये पाय ठेवल्यावर मनातील हुरहूरीने डोकं वर काढलं. तिथून माझ्या वर्गात पोहोचेपर्यंत 'आता माझं काही खरं नाही', ही भावना उफाळून आली. याला कारण म्हणजे मराठी माध्यामातून शिक्षण पूर्ण केलेल्या मला आता प्रत्येकाशी इंग्रजीतून संवाद साधायचा होता. पण शाळेत शिकलेल्या इंग्रजीने मला 'Try Try but don't cry' ही उक्ती साध्य करण्याची उमेद दिली. यातूनच introductionच्या पहिल्या तासिकेमध्ये थोडेफार का होईना पण निर्भीडपणे इंग्रजी बोलले. असे करता करता तोडकं मोडकं पण इंग्रजी बोलायचं या निश्चयाने पाच वर्षांच्या कालावधीत bilingual म्हणजे काय हे गवसताना आपण multilingual बनल्याची प्रचिती आली. तेलुगू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या नित्यनेमाच्या भाषा बनल्याने multilingual बनणं मजेशीर ठरलं!रक्ताची नाती निवडताना नसलेले स्वातंत्र्य मित्रमैत्रिणी निवडताना मिळते, हे आपण नेहमीच ऐकतो. पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर असते. कदाचित मी ते योग्यरीत्या वापरले असेन, म्हणूनच माझी साथ देणारे, चूक दाखवून देणारे आणि ती सुधारण्यास मदत करणारे आणि महत्वाचे म्हणजे माझ्या कमतरतांना कमी न लेखता प्रोत्साहन देणारे सवंगडी मला लाभले. एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ समजला नाही तर न लाजता त्याचा अर्थ विचारण्याची प्रेरणा मला या मैत्रीने दिली. यातूनच हाताची पाचही बोटे सारखी नसली तरी त्यांना समान मानण्याचा धडा मी माझ्या जीवनात गिरवला.
Xavier's आपल्या extracurricular activitiesसाठी प्रसिद्ध आहे. हे उपक्रम म्हणजे पुस्तकापलीकडली पाठशाळा! यातील काही उपक्रमांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. Xavier's Resource Centre for Visually Challenged (XRCVC) द्वारे visually challenged व्यक्तींना शिकवताना त्यांचे कष्ट व अडचणींची जाणीव झाली आणि आपल्याकडे जे आहे त्यात संतुष्ट राहण्याची शिकवण मिळाली. विविध उपक्रमांमध्ये volunteer म्हणून apply केल्यावर होणार्या Group Discussion (GD) द्वारे कल्पकता, spontaneity, आत्मविश्वास व स्वमताचे महत्व समजले. Xavier'sचा आंतरमहाविद्यालयीन सोहळा Malhar मधील GD मध्ये अपयश आले असतानाच कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्यानंतर खचून न जाता प्रयत्न करत राहण्याची जिद्द मिळाली. रक्तदान करणे, मुलाखत घेणे, ट्रेनचा प्रवास, वादविवाद स्पर्धेत सहभागी होणे, collegeच्या अंकासाठी लेख लिहिणे असे अनेक firsts या काळात अनुभवता आले. प्रत्येक दिवस नवा अनुभव व नवी संधी घेऊन आला. यातील काहींमध्ये अपयश आले तर काहींमध्ये यशाचे गमक साधता आले. अशीच एक संधी म्हणजे St. Xavier's Collegeच्या मराठी वाङ्मय मंडळाची संपादिका बनणे! Admissionच्या वेळी college hallचा stage पाहून तिथे जाण्याची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली ती MVMमुळे. मंडळाची सदस्या म्हणून कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करणे व अंकासाठी लेख लिहिण्यापासून मंडळाची संपादिका बनून 'पखरण' या अंकाचे संपादकीय लिहिण्यापर्यंतचा प्रवास अनोखा आणि अविस्मरणीय आहे. या आणि अशा अनेक कथांनी Xavier'sचा कालावधी भरगच्च बनला आहे.
पाच वर्षांपैकी दोन वर्षे online मध्ये असताना देखील प्रत्येक lectureच्या login windowत पोहोचताच Xavier'sची प्रतिमा डोळ्यांसमोर येत असे. Onlineच्या काळातही Mathematics in Rangoli, My Caste & Me, Bommarillu through Sociological Lenses अशा विविध assignmentsमुळे हा प्रवास नाविन्यपूर्ण व experimental ठरला. इथे कदाचित आपुलकीची ऊब दडली असावी, म्हणूनच आजही पाय ठेवल्यावर हा परिसर आपलासा वाटतो. हाताला मुंग्या येऊन हात दुखेस्तोवर उत्तरपत्रिकेवर लिहिण्याची सवय गेली असतानाही lockdownनंतर OLT (One Last Time) म्हणत end semsला पेपर झाल्यावर इथला प्रवास संपत आल्याच्या जाणिवेने एकच कोलाहल निर्माण झाला. या काळात Xavier's दुसरे घर बनले होते. Xavierite कडून Ex-Xavierite म्हणून चालणारा प्रवास डोळ्यांत पाणी आणणारा असला तरी मानसिक समाधान देणारा ठरला. हा 'आजी ते माजी'पर्यंतचा प्रवास म्हणजे गोंधळलेल्या स्वपासून Confident स्वपर्यंतचा प्रवास! त्याबद्दल जितके लिहावे तितके कमीच आणि या अनुभवकथांची रांग विस्तारात जाईल तितकी जास्तच!
Woods चा निसर्ग, Chapel मधील शांतता, Quad मधील फोटो sessions, 40s मधील lectures, Libraryतील interesting discussions, Canteenमध्ये काय घेऊ हे ठरवण्यासाठी लागणारा वेळ, Foyer मधील open mic sessions, भूलभुलैया वाटणार्या पण मजेशीर वाटा, Photo copy centre जवळची गर्दी, college बाहेरील उसाचा रस, सँडविच आणि बरंच काही म्हणजे Xavier's!
ट्रेनच्या सकाळच्या गर्दीने दमून गेले तरी Xavier'sच्या प्रांगणात पाऊल ठेवताच आजही थकवा नाहीसा होतो. याला कारण म्हणजे इथल्या आठवणी, अविस्मरणीय क्षण, असंख्य अनुभव आणि इथल्या भिंती! या भिंती दगडाच्या असल्या तरी 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही' या उक्तीनुसार मेहनतीचे धडे गिरवल्याशिवाय यशस्वी बनता येत नाही, याची प्रचिती देतात. म्हणूनच म्हणावेसे वाटते, Xavier's.....It's not just college, it's a Way of Life!


3 cheers for the best person 🥳🥳🥳🥳 Khup Khup sunder lihilay lekh. My god ❤️❤️❤️
ReplyDelete