राजकीय सदनाच्या आवारात वावरताना...
प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड असतो आणि तो गोड नसेल तर तो शेवट नसतो, असं मी बरेचदा ऐकलंय. पण प्रत्येक शेवट हा शेवटच असेल हे कसं ठरतं? एखाद्या प्रसंगाचा शेवट ही एखादी नवीन सुरुवात देखील असू शकते. Graduation हा शिक्षणाचा शेवटचा टप्पा असेल हे ठरवताना Post-graduation च्या माध्यमातून पुढील शिक्षणाची वाटचाल मुंबई विद्यापीठाच्या फिरोझशाह मेहता भवनाच्या प्रांगणात सुरू झाली. आणि इथूनच एक नवा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत समवयस्क सवंगड्यांसोबत शिकत असताना आलेला अनुभव विविधांगी क्षेत्रांतून Political Scienceच्या क्षेत्रात आलेल्या सवंगड्यांच्या बाबतीत नक्कीच वेगळा ठरणार होता. इकडे कोणी विषयाची आवड म्हणून तर कोणी त्याच विषयात पुढचे शिक्षण घेण्यासाठी येतो.
विद्यापीठाच्या आवारातील सुंदर वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात M.A. साठी admission घेतल्यावर विज्ञानाच्या प्रयोगशाळेत practicals मधून Science समजून घेता येते तसेच राज्यशास्त्रामध्ये दडलेले शास्त्र practicalsच्या रूपात अनुभवण्याची इच्छा होती. Graduationच्या शेवटाकडे येताना Post-graduationचा घेतलेला निर्णय एक नवा अनुभव गाठीशी जोडणार होता याची कल्पना देखील केली नव्हती.
डिसेंबर महिन्याच्या ११ ते १८ या आठ दिवसांच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५०व्या संसदीय अभ्यासवर्गात मुंबई विद्यापीठातर्फे जाण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने नागपूरमध्ये होणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जवळून पाहता आले. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सभागृहाचे कामकाज पाहण्याची ही संधी अनोखी ठरली. जुलै महिन्यात मुंबई मधील विधानभवनात पावसाळी अधिवेशनास जाता आले. टीव्हीवर दिसणारे अधिवेशन डोळ्यांदेखत पाहताना वेळ कसा जातो ते लक्षात येत नाही. मुंबईमध्ये अर्धा तास विधानसभा आणि अर्धा तास विधानपरिषदेतील चर्चा ऐकल्यानंतर योगायोगाने विदर्भातील नागपुरात होणार्या हिवाळी अधिवेशनावेळी उपस्थित राहण्याची इच्छा या ८ दिवसांत पूर्ण झाली. सकाळी संसदीय कामकाज व संसदीय लोकशाहीवर आधारित अभ्यासवर्ग झाल्यावर दिवसभरात दोन्ही सभागृहांचे कामकाज पाहणे व विधिमंडळाच्या विविध विभागांना भेट देणे, अनौपचारिक चर्चासत्र असा दिनक्रम ठरला होता. उरलेल्या वेळेत विधानभवनाच्या आवारात होणाऱ्या पत्रकार परिषदा ऐकणे, आमदारांची भेट तसेच या परिसरातील राजकीय वातावरण अभ्यासणे अशा विविध गोष्टी अनुभवता आल्या. शनिवारी चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाला भेट दिली. असा ८ दिवसांचा हा कार्यक्रम विविध गोष्टींनी परिपूर्ण बनला.
अभ्यासवर्गात संसदीय कामकाज, विधिमंडळ सदस्यांची भूमिका, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, लोकशाहीत युवा पिढीचे योगदान अशा विविधांगी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासवर्गाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात ही विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत व्हायची. जिवाचा आटापिटा करून निवडणूकीच्या रिंगणात जिंकून आल्यावर 'आमदार' हा सदस्यत्वाचा शिक्का मिळवून सभागृहात आमदारांची होणारी स्थाननिश्चिती आपल्याला माहीत आहेच. परंतु निवडणूक लढवण्याची वयोमर्यादा येण्यापूर्वीच सभागृहात बसून टेबल वाजवत एखाद्या मुद्द्यावर आपली सहमती दर्शवण्याचा अनुभव राजकीय पटलावरील जडणघडण दाखवून गेला. अभ्यासवर्गाद्वारे नीलम गोऱ्हे, बाळासाहेब थोरात, अभिजीत वंजारी, अंबादास दानवे अशा राजकारण्यांमध्ये दडलेला जबाबदार व सज्ञान वक्ता पाहता आला. वक्त्यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरांची सरबत्ती पाहून प्रत्येक लोकप्रतिनिधीला सभापतींसमोर आपले मुद्दे मांडताना करावी लागणारी चढाओढ स्पष्टपणे जाणवली.
दोन्ही सभागृहात होणाऱ्या चर्चा रोज प्रेक्षक गॅलरीमधून बघताना अधिवेशनात होणारा विविधांगी विचारविनिमय दिसून आला. इथे सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर चालणारी टीकेची तोफ वैचारिक आणि माहितीपूर्ण उत्तरांनी शमत होती. प्रसंगी सत्ताधारी आणि विरोधक हा फरक मिटून सदस्यांचे एकमत दिसून आले. सत्ताधारी पक्षातील आमदार मंत्र्यांना विचारत असलेल्या प्रश्नांमधून विधिमंडळ हे लोकशाहीचे बलस्थान असल्याचे जाणवले. आपला राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि सभागृहात चालणार्या घडामोडींमधील तफावत दिसली. या काळात काही वादग्रस्त विधाने केली गेली तर काही विधेयके पारित केली गेली. म्हणूनच वाद-विवाद-संवाद या त्रिकूटावर लोकशाहीचा पाया उभा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विधीमंडळाच्या विविध कक्षांना दिलेल्या भेटींमधून सभागृहाच्या पटलावर मांडल्या जाणार्या प्रश्नांची निवड प्रक्रिया समजली. अशा सर्व गोष्टी प्रत्यक्ष समजून घेत असताना राज्यशास्त्राचे practical उमगले.
अधिवेशनाच्या माध्यामातून विधानभवनाच्या परिसरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे दर्शन झाले. आमदारांशी बोलताना राजकारण्यामागे दडलेल्या व्यक्तींना भेटता आले. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्यात पडलेल्या सुईचा आवाज सदनापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच विविध अधिकारी व सामान्य जनतेचे प्रयत्न दिसून आले. विविध विद्यापीठांच्या विद्यार्थी तसेच प्राध्यापकांशी बोलताना महाराष्ट्र जाणून घेता आला. इतरांचे राजकीय विचार, मतांची विभिन्नता, युवा पिढी म्हणून राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांमुळे ज्ञानात भर पडली. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात महाराष्ट्राचे हे दर्शन अशक्य आहे हे प्रकर्षाने जाणवले. सोबत आलेल्या विद्यार्थ्यांचा इथपर्यंत पोहण्याचा प्रवास पदोपदी आपण भाग्यवान असल्याची जाणीव करून देत राहिला. विधीमंडळाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाची एक निराळी कहाणी बघताना राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध बाबींचा मेळ घडवून आणणारा melting pot म्हणून हे सदन आपले महत्त्व अबाधित राखत असल्याचे दिसून आले.
नागपूर म्हटलं की आठवते ती इथली प्रसिद्ध संत्रा बर्फी. परंतु नागपूर हिवाळी अधिवेशनाचा हा दौरा नागपूरच्या संत्रा बर्फीप्रमाणे वेगळा आणि अनोखा अनुभव ठरला. येथे मिळालेली अनुभवाची शिदोरी एक विद्यार्थी, नागरिक व मतदार म्हणून नक्कीच एक नवी दिशा देणारा ठरला.
Khup sunder lihila aahes anubhav!!! Mastach 💕
ReplyDeleteSundar lekhan
ReplyDelete