म्हातारपणातील बालपण अनुभवताना

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण, हे वाक्य मी अनेकदा, अनेकांच्या बाबतीत, अनेकांच्या तोंडून ऐकलं आहे. स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या आजी-आजोबांना शेवटच्या श्वासापर्यंत पाठीचा कणा ताठ ठेवून वावरताना तसेच दात निखळले म्हणून आपला शब्द समोरच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतांना पाहिले आहे. Paralysisच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या आजोबांचा प्रवास ऐकला तर याच रोगामुळे खाट अंगाशी कवटाळलेल्या आजीला लेक, जावई व नातवंडांना डोळे भरून बघताना पाहिलं. आपल्या आजी-आजोबांच्या पाठीशी त्यांची मुलं जिवाच्या आकांताने त्यांचा सांभाळ करत होती हे जाणवल्याने आपल्या माणसांच्या सहवासाची गरज आणि त्यांचे महत्व कायम अधोरेखित होत राहिले आहे. 

पालकांच्या तोंडून हे अनुभव ऐकत असताना वृद्धाश्रमांची वाढती संख्या, तिकडे दाखल होणारे किंबहुना बर्‍याचदा दाखल केल्या जाणाऱ्या वयोवृद्धांमध्ये आपल्या ओळखीतील व्यक्ती आहेत म्हणून वाईट वाटणारे विरोधाभासी प्रसंग मांडले जातात. काही प्रसंगी गरज म्हणून तर कित्येकदा वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याची इच्छा नसणारे अपत्य वृद्धाश्रमाकडे धाव घेतात. ज्यांनी बोट धरून चालवायला शिकवले, निर्मळ मनाला व्यावहारिक जगात तग धरून उभे केले अशा पालकांना जीवनाच्या नाजूक टप्प्यात अनोळखी व्यक्तीकडे सुपूर्त करण्याची वेळ येते. अशा गोष्टी आजच्या अंतर आणि वेळ संकोचनच्या (space-time compression) काळात होणार्‍या नात्यांच्या ध्रुवीकरणाचे वास्तव मांडते. काही वेळा नात्यांच्या कोवळ्या पाकळ्या सुकून रोषाचा चुरा गाठीशी सापडलेले लोक आले दिवस ढकलत जगतात तर काही जण आयुष्याच्या शेवटच्या क्षणांत नवीन नाती गुंफत वृद्धाश्रमात उरलेला जीवनकाल व्यतीत करतात. 

असे प्रसंग ऐकताना बदलत्या जीवनशैलीसोबत नात्यांचे बदलते समीकरण दिसून येते. उन्हाने नव्हे तर अनुभवाने पिकलेले केस मार्गदर्शक बनून गळण्याच्या टप्प्यावर असताना अचानक वाट्याला आलेले नवीन आयुष्य वयोवृद्धांच्या तोंडून ऐकताना बदलती समीकरणे शब्दांत गुंफली जातात. दिवाळीचा आनंद लुटल्यावर काही दिवसांनी मला या गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली. डोंबिवलीतील आंध्र कला समितीच्या (AKS) Service Brings Smiles (SBS) या कार्यक्रमांतर्गत अंबरनाथ येथील Pushpa Old Age Home या महिलांसाठी उभारलेल्या वृद्धाश्रमाला भेट दिली. ही भेट म्हणजे आपल्यातील, आपल्यासारखेच पण आपलेपणाच्या जाणिवेला आसुसलेल्या चेहऱ्यांचे दर्शन घडणे. 

आश्रमाच्या आवारात शिरताच चोहोबाजूंनी पसरलेली हिरवळ परिसरातील सकारात्मकता दर्शवत होती. विविध फळझाडे, फुलझाडे यांनी बहरलेली वाट इकडे राहत असलेल्या आजींना भेटण्याच्या मार्गात जणू पसरलेला सडा बनून स्वागत करत होते! समोर दिसणार्‍या नवीन चेहर्‍यांसोबत हस्तांदोलन करताना या वृद्ध आजींच्या तनामनाचा क्षीण कुठच्या कुठे पळून जाताना बघितला. निघताना मिळवले जाणारे हेच हात दिवसागणिक दाट होत जाणाऱ्या सुरकुत्यांसोबत येणारा प्रत्येक क्षण जगण्याची निश्चयशक्ती बाळगतात, याची शाश्वती देत होते. सहानुभूतीच्या मळभाची जागा आता इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आपुलकीच्या औदार्याने घेतली होती.

९६ वर्षाच्या आजीचे गाणे, वाढदिवसाचा उत्साह असणारी आजी, आपल्या सहवासात वाढलेल्या मांजरीचे कौतुक करताना आणि तिची आमच्याशी ओळख करून देताना म्याँवची साद आमच्यापर्यंत पोहोचवणारी आजी, समोरच्या व्यक्तीला अपत्यासमान मानून आपले सुखदुःख त्यांच्याबरोबर वाटणारी आजी, जेवणाच्या ताटातील स्वीटडिश पाहून अंगात त्राण नसतानाही डोळ्यांत तेज दाटून आलेली आजी, प्रेमळ, मिश्कील तसेच अटीतटीच्या भांडणांबद्दल सांगताना, तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना, या म्हणीवर जोर देत सहप्रवासी बहिणींविषयी सांगवारी आजी, दुरून निरीक्षण करत ओठांवरील स्मितहास्याने आपली उपस्थिती दर्शवणारी आजी आणि तेलुगूभाषिक पाहुण्यांमध्ये मातीशी घनिष्ठ असलेल्या नाळेची आर्त साद ऐकून आमच्याशी समरूप होणारी आजी अशा अनेक भावभावना, आचारविचार आणि व्यक्तिमत्व बाळगणाऱ्या स्त्रियांशी भेट घडून आली. 

आमच्याशी बोलताना, गप्पा मारताना वृद्धाश्रमातील या आजी तारुण्याच्या पाऊलखुणा टिपत होत्या. नृत्य व गायन कलेचे सादरीकरण करताना त्यांचा उत्साह पाहून रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जाणवणारी मरगळ वायफळ वाटू लागली. आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त "बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये" गाण्यावर ठेका धरून नाचत शतायुषी होण्याचा आशिर्वाद देताना सगळ्याच आजींचा उत्साह ओसंडून वाहत होता. सध्याच्या फोटो काढण्याच्या काळात कुठून प्रकाश आला तर फोटो सुंदर दिसेल हे शोधताना आमच्यातले पिढ्यांचे अंतर नाहीसे झाल्याचे भासले. ज्यांचा वाढदिवस होता त्या आजीने केक कापल्यानंतर आवर्जून सगळ्यांना केक वाटून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. 

जेवणानंतर सगळ्या महिला झोपायला गेल्यावर एक आजी उरलेल्या वेळात माझ्याशी गप्पा मारत होत्या. त्यांनी उत्साहाने माझ्या हाताला धरून मला आश्रमाचा पूर्ण परिसर फिरवून आणला. पेरू, सीताफळ आणि केळीच्या झाडांना कधी फळ येतात, फुलझाडे बघत दिवस कसा सरतो हे समजावून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न बघताना शब्दांची जागा हातवार्‍यांनी घेतली. बोलणं जड जातानाही निखळलेल्या दातांसह बोलण्यासाठी केला जाणारा प्रयत्न, आलेल्या पाहुण्यांसोबत वेळ घालवण्याची त्यांची धडपड खूप काही सांगून गेली.  

निघताना डोक्यावर ठेवलेल्या अनोळखी हातातून काही तासांच्या सहवासातच आपुलकीची उब जाणवली. सुखी रहा, God bless you म्हणून आशिर्वाद देणारे हात त्यांच्या मनातील आपलेपणाचा ओलावा, सहवासाची ओढ, एकटेपणाची दाहकता व जगण्याची उमेद अशा संमिश्र भावनांची सांगड घालून देत होते. त्यांच्या चेहर्‍यावरील गोंडस आणि निर्मळ हसू पुनर्मिलनाची आशा पल्लवित करत होते. पुन्हा कधी भेट घडून येईल याची खात्री नसताना देखील येणार्‍या प्रत्येक पाहुण्याला पुन्हा या ही साद घालणाऱ्या या आजींची सवय ऐकून निराशेच्या बोगद्यामध्ये देखील आशेचा उजेड कसा शोधावा याची जाणीव झाली. 

लहान बाळांचे बोबडे बोल ऐकून प्रसन्नता अनुभवता येते. तर सुती कापडात घट्ट गुंडाळून ठेवलेल्या बाळाचे ओकार नाविन्यपूर्ण वातावरणाची निर्मिती करतात. अशा प्रत्येक घटनेसोबत भावी आयुष्याची पाउलवाट रेखाटली जाते. या पाऊलवाटेवर शेवटच्या टप्प्यावर पोहोचताना पुनश्च बालपणाची अनुभुती होते. बोबड्या बोलण्यातून सुरू झालेला प्रवास, बाल्यावस्था, तारुण्य, प्रौढत्व आणि अंततः वृद्धापकाळापाशी येऊन ठेपतो. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात समोर येणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ एकवटलेल्या सगळ्या आजींना भेटून नवचैतन्य निर्माण झाले. 

आमच्या सोसायटीच्या शेजारी असलेल्या वृद्धाश्रमातील आजींना माझ्या लहानपणी मी रोज बघायचे. शाळेतून घरी येताना न चुकता त्यांना भेटून त्यांच्याकडून साखरफुटाणे घ्यायचे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचा माझा दिनक्रम ठरलेला असायचा. वृद्धाश्रमांची गरज का असते हे समजण्यापूर्वीच आमच्या शेजारचे वृद्धाश्रम दुसरीकडे हलवण्यात आले. Pushpa Old Age Homeच्या भेटीने सतत कानावर येणार्‍या गोष्टींमागचे वास्तव दिसून आले. इथे राहत असणार्‍या आजींनी आपले उर्वरित आयुष्य सुखाने जगावे ही आशा बाळगून मी परतीचा प्रवास सुरू केला आणि म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असे का म्हणतात याची प्रचिती आली!

Comments

Popular posts from this blog

मतदान कक्षातील बाकावरून

हवेहवेसे वाटणारे वेंधळेपण: स्वत्व साधण्याचे आपलेपण

पानांमध्ये दडलेला सुवास अनुभवताना...